अजित पवारांना फलटण मध्ये धक्का ! १४ तारखेला राजे गट तुतारी फुंकणार!
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ - उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फलटणमध्ये मोठा धक्का बसत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आ. दीपक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि राजे गट हे दिनांक १४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करून तुतारी फुंकणार असल्याचे आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात स्पष्ट झाले आहे.
महायुतीत असताना सुद्धा भाजपच्या नेतेमंडळी कडून होत असलेली अडवणूक व कार्यकर्त्यांना मिळत नसलेला सन्मान यामुळे पक्ष बदल करण्याचा दबाव कार्यकर्त्यांकडून नेते मंडळीवर होता. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कानावर घालून, न्याय देण्याची मागणी केली होती, मात्र यावर कोणतीच भूमिका स्पष्ट न झाल्यामुळे आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक होऊन, त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण व विद्यमान जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि राजे गटाचे सर्व कार्यकर्ते यांनी दिनांक १४ रोजी खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार साथ दिली.
आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात साथ देत दिनांक १४ रोजी मोठे शक्ती प्रदर्शन करीत प्रवेश करण्याचा मानस व्यक्त केला.
No comments