छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा भूमिपूजन सोहळा संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महाराणी सईबाई व छत्रपती संभाजीराजेंची वेशभूषा केलेले घोडेस्वार लक्ष वेधून घेत होते. यावेळी फलटण येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिकृती देखील ठेवण्यात आली होती. भूमिपूजन सोहळ्यास अनेक मान्यवर नागरिक युवक, युवती उपस्थित होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मुधोजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वढू बुद्रुक येथून आणलेली ज्योतीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच अग्रगण्य उद्योजक रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
भूमिपूजन प्रसंगी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपकराव चव्हाण यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ अश्वारूढ पुतळ्यासाठी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीने अश्वारूढ पुतळ्याचे काम कोल्हापूर येथील आर्किटेक्ट पाटणकर यांच्याकडे दिले असून सध्या पुतळ्याचे काम सुरू असल्याचे सांगून, भारताचेच नव्हे तर जगातील अग्रगण्य उद्योजक रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा श्रीमंत संजीवराजे यांनी घेतला.
No comments