महाराज साहेब! तुतारी हाती घ्या! कार्यकर्त्यांचा श्रीमंत रामराजे यांना खटकेवस्ती येथील सभेत आग्रह
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ - आमच्या कार्यकर्त्यांना किंमत नसेल आणि त्यांना धमकावले जात असेल तर याबाबतीत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढे गाऱ्हाणे मांडू अन्यथा वेगळा निर्णय घेऊ असे स्पष्ट करतानाच माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात हिम्मत असेल तर दोघेही अपक्ष उमेदवार उभे करू एकदा काय व्हायचे ते होईल असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. दरम्यान सभेत असंख्य कार्यकर्त्यांनी, माहितीतील घटक पक्ष भाजपाकडून कसा त्रास होतोय ते सांगून, श्रीमंत रामराजे यांनी तुतारी हाती घ्यावी असा आग्रह करून, राम कृष्ण हरी वाजवा तुतारी अशा घोषणा दिल्या.
खटकेवस्ती ता. फलटण येथे आयोजित संजय गांधी निराधार योजनेचे फलटण तालुका अध्यक्ष तथा खटकेवस्ती सरपंच बापूराव गावडे यांच्या वाढदिवसानिमित् आयोजित सत्कार कार्यक्रमात आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर,माजी पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्र्वजितराजे नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते.फलटण तालुक्यातील जनतेने गेले तीस वर्षापासून आमच्यावर मनापासून प्रेम केले आहे. त्यामुळे जनतेच्या विकासाचा ध्यास घेऊनच आम्ही पुढे चाललो आहे, आज आमच्या कार्यकर्त्यांना ईडीची भीती दाखवली जाते, मात्र आम्ही खंबीरपणे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिलो असून यापुढे कार्यकर्त्यांना धमकावणे दमदाटी करणे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.
कार्यकर्त्यांची खासदार शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन तुतारी हाती घेण्याची मोठी मागणी आहे, मात्र आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर कार्यकर्त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत पुन्हा एकदा व्यथा मांडणार असून, यातून जर सुटका होत नसेल तर कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे विचार करू अशी ग्वाही श्रीमंत रामराजे यांनी दिली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्रमास देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा येणार होते मात्र त्यांनी येऊ नये म्हणून माण मधून त्यांना फोन गेले त्यामुळे ते येऊ शकले नाही. महायुतीत असून सुद्धा आमचे ऐकले जात नसेल व आमच्या कार्यकर्त्यांना किंमत मिळत नसेल तर महायुतीत राहायचे की नाही याचा गंभीर विचार करावा लागणार आहे.
कार्यकर्त्यांची तुतारी हाती घेण्याची मागणी जोर धरत असली तरी मी अद्याप खासदार शरदचंद्र पवार यांना भेटलेलो नाही जायचे झाले तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करूनच जाणार असून येत्या दोन ते तीन दिवसात कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा करूनच काय निर्णय घ्यायचा याचा निश्चित विचार करण्यात येईल असे आमदार श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील आणि देशातील भाजप वेगळी व सातारा जिल्ह्यातील भाजप वेगळी असे चित्र सध्या उभे असून सहा आमदारांच्या मतदारसंघाचे नेतृत्व करणारा खासदार माणच्या आमदाराच्या मागेपुढे स्वीय सहायक म्हणून मिरवतो हे दुर्दैवी आहे अशी बोचरी टीका करतानाच माजी खासदार रणजितसिंह व मानचे आमदार जयकुमार गोरे यांनी मला पुण्यातील एका प्रकरणात अटक करण्याचा प्रयत्न केला होता . अनेक वेळा मला अडचणीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला असला तरी असल्या प्रयत्नाला आपण भिक घालत नाही असले गलिच्छ राजकारण सध्या सातारा जिल्ह्यात चालले असून या दोघांना धडा शिकवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा इशाराही आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.
नीरा देवधर व धोम बलकवडीच्या पाण्यावरून माजी खासदाराकडून दिशाभूल सुरू आहे त्यांचात जर हिम्मत असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोघेही अपक्ष उमेदवार उभा करू हिम्मत असेल तर त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी दूध का दूध पाणी का पाणी होईल असे आव्हान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
आतापर्यंत तीन वेळा आमदार दीपक चव्हाण हे निवडून आले असून चौथ्यांदा सुद्धा त्यांनाच आपण उमेदवारी देणार असून त्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करावी असे आवाहन आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
यावेळी आमदार दीपक चव्हाण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आदींची भाषणे झाली. याच कार्यक्रमात बहुसंख्य कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घेण्याची आग्रही मागणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे केली.
No comments