Breaking News

शेतकरी व व्यापारी यांचा समन्वय ठेवून फलटणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यात आपला नावलौकिक वाढवावा - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

Phaltan's Agricultural Produce Market Committee should enhance its reputation in the state by coordinating farmers and traders - Shrimant Ramraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ - फलटणची कृषी उत्पन्न बाजार समिती ही श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत असून, बाजार समितीच्या माध्यमातून पेट्रोल पंप सुरू करणे त्याचबरोबर आता नव्याने "थ्री स्टार हॉटेल" सारख्या हॉटेल व्यवसायामध्ये फलटणची कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेश करीत आहे. ही बाब निश्चितच उल्लेखनीय असून भविष्यातही शेतकरी व व्यापारी यांचा समन्वय ठेवून फलटणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यात आपला नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

    फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची आज वार्षिक सर्वसाधारण सभा बाजार समितीच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची आमदार दीपक चव्हाण, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता बापू अनपट, फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष प्रा. भिमदेव बुरुंगले, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वासदादा गावडे, फलटण दूध पुरवठा संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ याप्रसंगी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना पुढे श्रीमंत रामराजे म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना विविध सोयी सुविधा पुरवाव्यात शेवटी शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाला योग्य तो भाव मिळणे गरजेचे असून यासाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने आधुनिक पद्धतीने मार्केट कमिटी चालवून मार्केट कमिटी ऑनलाईन करावी अशी ही अपेक्षा शेवटी श्रीमंत रामराजे यांनी बोलून दाखविली.

    कार्यक्रमाची प्रास्ताविकात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे यांनी मार्केट कमिटीच्या माध्यमातून भविष्यात शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

    कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकराव सोनवलकर यांनी विषयाचे व ठरावाचे वाचन केले यावेळी सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

No comments