अनुप शहा यांनी तोंडाला लगाम लावावा ; आगवणे आणि माजी खासदारांच्या परस्पर व्यवहारात राजे गटाला घेऊ नये - प्रितसिंह खानविलकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ - : माजी नगरसेवक अनुप शहा हे प्रसिद्धीच्या मोहापायी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. अनुप शहा यांनी खोटे आरोप करणे थांबवावे. त्यांनी वेळीच स्वत:च्या तोंडाला लगाम लावावा अन्यथा राजे गट शांत बसणार नाही असा इशारा राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिला आहे.
माजी नगरसेवक अनुप शहा यांनी काल पत्रकार परिषद घेवून, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उध्वस्त करण्यासाठी राजे गटाकडून आगवणेंचा वापर केला जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपाचे तीव्र शब्दात खंडन करताना प्रितसिंह खानविलकर यांनी नमूद केले आहे की, "आगवणे आणि माजी खासदारांच्या परस्पर व्यवहारात राजे गटाला घेऊ नये. काही दिवसांपूर्वी ज्या आगवणेंच्या पैशावर खासदार गट चालत होता, त्याच आगवणेंच्या मुलींवर आत्महत्त्येचा प्रयत्न करण्याची वेळ कुणी आणली? हे सातारा जिल्ह्याला माहित आहे. आगवणेंचा वापर करुन, खासदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्याची राजे गटाला काही एक गरज नसून, खासदारांनी महाराजांवर आरोप करा म्हणून आगवणेंवर दबाव आणला होता, परंतु आगवणे त्या दबावात आले नाहीत. दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून, असले चाळे करणारा राजे गट नाही, हे अनुप शहांनी लक्षात ठेवावे. आमच्या नेतृत्त्वावर आरोप करण्यापूर्वी त्यांनी आधी स्वत:ची पात्रता तपासावी आणि भान ठेवून बोलावे, असा इशाराही प्रितसिंह खानविलकर यांनी शहा यांना दिला आहे.
No comments