सुमित मोहिते यांची मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ - फलटणचे सुपुत्र माजी राष्ट्रीय हॉकी खेळाडू सुमित संभाजीराव मोहिते यांची मलेशिया येथे होत असलेल्या १२ व्या सुलतान जोहर कप २०२४ आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी अंपायर म्हणून निवड झाली आहे . सदर स्पर्धा जोहर बहरू मलेशिया येथे १९ ते २६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान होत आहे. सदर स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया,ग्रेट ब्रिटन, न्यूझीलंड ,जपान व मलेशिया या सहा देशांचा सहभाग आहे.
या स्पर्धेसाठी सुमित मोहिते यांची अंपायर म्हणून निवड करण्यात आली आहे . सुमित मोहिते यांनी अनेक हॉकी इंडिया अंतर्गत ज्युनिअर , सीनियर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये , देशांतर्गत आमंत्रित हॉकी स्पर्धांमध्ये तसेच नॅशनल गेम्स , गोवा खेलो इंडिया युथ गेम्स, चेन्नई अशा मुख्य स्पर्धांमध्ये अंपायर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे . २०१५ पासून ते अंपायर म्हणून आपले कार्य बजावत आहेत. सुमित मोहिते यांनी अंपायर मॅनेजर म्हणून सुद्धा अनेक हॉकी इंडियाच्या स्पर्धांमध्ये काम पाहिले आहे.
नुकतेच हॉकी इंडिया तर्फे आयोजित वेस्ट झोन अंपायर कोर्सेस - बालेवाडी , पुणे व नवल टाटा हॉकी अकॅडमी , जमशेदपूर या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे . सुमित मोहिते हे मुंबई या ठिकाणी मुंबई सीमा शुल्क विभागात नोकरीस आहेत. मुंबई कस्टम विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले व त्यांचे अभिनंदन केले. सदर निवडीबद्दल त्यांचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. या निवडीसाठी हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिरकी , सेक्रेटरी जनरल भोलानाथ सिंह, हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष आयपीएस कृष्णप्रकाश, सेक्रेटरी मनीष आनंद , सीनियर व्हाईस प्रेसिडेंट मनोज मोरे व ऑलिंपियन राहुल सिंह यांचे मार्गदर्शन लाभले. दि हॉकी सातारा संघटनेचे सेक्रेटरी महेश खुटाळे व सर्व सदस्य तसेच फलटण शहरातील सर्व आजी-माजी वरिष्ठ हॉकी खेळाडू तसेच त्यांचे सहकारी व ज्युनिअर खेळाडू यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सुमित संभाजीराव मोहिते यांचे माध्यमिक शिक्षण हे फलटण येथे फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण तसेच मुधोजी महाविद्यालय फलटण या ठिकाणी झाले. हॉकी खेळण्याची सुरुवात त्यांनी इयत्ता ५ वी पासून मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये शिकत असताना केली. शालेय स्तरावर त्यांनी विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतला. तसेच विद्यापीठ व वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये देखील सहभाग घेतला होता. शालेय जीवनामध्ये त्यांना हॉकीचे प्रशिक्षण ज्येष्ठ मार्गदर्शक श्री जगन्नाथ धुमाळ सर यांनी केले. सुमित मोहिते हे २००७ रोजी मुंबई पोलीस दलात हॉकी खेळाडू म्हणून भरती झाले होते व त्यानंतर २०१६ रोजी ते मुंबई सीमा शुल्क विभाग या ठिकाणी हॉकी खेळाडू म्हणून भरती होऊन आपले कर्तव्य बजावत आहेत.
No comments