भाजपा महायुतीचे फारसं आव्हान नाही, दिपकराव चव्हाण चांगल्या मतांनी निवडून येतील - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.25 - भाजपा महायुतीचे फारसं आव्हान नाही, हा मतदारसंघ नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे उभा राहिलेला आहे. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ असल्यामुळे फारसं काही कोणाचं आव्हान आहे असे वाटत नसल्याचे सांगतानाच विधानसभा निवडणुकीत फलटण कोरेगाव मतदार संघात दिपकराव चव्हाण चांगल्या मताने निवडून येतील असे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. तर प्रतिस्पर्धी उमेदवार भाजप अथवा घड्याळ कुणाच्याही चिन्हावर लढला तरी आम्हाला काही फरक पडणार नसल्याचे आ.दिपकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले
महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकराव चव्हाण यांचा फलटण-कोरेगाव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. याप्रसंगी श्रीराम मंदिर फलटण येथून शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. त्यानंतर आमदार दीपकराव चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांचेकडे सादर केला. यावेळी त्यांच्या समवेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास नाळे, युवा नेते सह्याद्रीभैय्या कदम उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व दिपकराव चव्हाण बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, आज महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या वतीने दीपकराव चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून, आम्हाला खात्री आहे की, आमदार दीपकराव चव्हाण चांगल्या मतांनी निवडून येतील, त्यासाठी आम्ही सर्व पक्ष आज पासूनच कामाला लागणार आहोत.
आमदार दीपक चव्हाण यांची, सर्वांना बरोबर घेऊन जाणारी प्रवृत्ती असून, मागील तीन टर्म मध्ये नागरिकांना त्यांचा अनुभव आलेला आहे. जनसामान्यांपर्यंत पोहचून, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा सातत्याने ते प्रयत्न करत असतात. विधानसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारणारा आमदार अशी त्यांची ख्याती झालेली आहे, १५ वर्षांचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन, त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय केला असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
एबी फॉर्म विषयी श्रीमंत संजीवराजे यांना विचारले असता, त्यांनी ए बी फॉर्म आज संध्याकाळपर्यंत मिळेल असे सांगून, तो आणण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुंबईला रवाना झाल्याचे देखील सांगितले.
आपण आज महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभेचे माजी सभापती आमदार रामराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण रोजगार निर्मिती, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, कालव्यांची कामे या सारख्या विविध महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक चांगल्या प्रमाणात केली आहे. तालुक्यात ज्या भागात पाणी नव्हते, तो भाग सुजलाम सुफलाम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीचा अनुभव आमच्या पाठीशी आहे. तीनही वेळेला मला जनतेचा आशीर्वाद मिळाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार भाजप अथवा घड्याळ कुणाच्याही चिन्हावर असला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आमचा जो मतदार आहे तो ठरलेला मतदार आहे. आजवर तीन वेळा विजय मिळाला असून या तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या जनतेने आम्हाला मतदान केले आहे. त्यामुळे समोर कुठलाही उमेदवार असला तरी आम्ही आमच्या कामामुळे तळागाळातील सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणून या निवडणुकीमध्ये विजय होईल की नाही हे भाकीत करण्याची आवश्यकता नाही, माझा विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार दीपकराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments