दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक ; युवक ठार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ - विडणी ता. फलटण गावच्या हद्दीत, आळंदी - पंढरपूर पालखी महामार्गावर, अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
अक्षय फत्तेसिंग धुमाळ वय २५ रा. फडतरवाडी ता. फलटण असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, अक्षय हा गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी आपली दुचाकी क्रमांक एमएच ११ डीपी २५९३ वरून पिंप्रदहून विडणीकडे चालला होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तो विडणी गावच्या हद्दीतील बालवडकर फार्म समोर आला असता, त्याच्या दुचाकीस पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये अक्षय हा डांबरी रोडवर पडल्याने त्याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची खबर संजय चंद्रकांत धुमाळ रा. फडतरवाडी ता. फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून अज्ञात वाहनावरील अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post Comment
No comments