पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाला ठोकणार टाळे - राहुलभैय्या निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ - फलटण शहरातील प्रभाग क्र १२ मधील संजीवराजेनगर, हाडको ,गोळीबार मैदान,विद्यानगर, महाराजा मंगल कार्यालय परिसरात, बारवबाग मध्ये जवळपास एक ते दिड हजार पेक्षा अधिक कुटुंब राहत आहेत, या परीसरातील नागरिकांना नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही, त्याचबरोबर पाणी कधीही सोडले जाते, तरी या भागामध्ये योग्य दाबाने व नियमित पाणीपुरवठा करावा, अन्यथा फलटण नगर परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढणार असून, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा श्रीमंत रामराजे युवामंच संस्थापक अध्यक्ष राहुलभैय्या निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे राहुलभैय्या निंबाळकर यांनी म्हटले की, नगरपरिषदेवर गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरू आहे, कोणाचाच कोणावर दबाव राहिला नसून, अनेक वेळा याबाबतीत मुख्याधिकारी व पाणीपुरवठा विभागाशी चर्चा केली तरी तेवढ्यापुरती सुधारणा होत असते, पुन्हा मागचे दिवस पुढे असेच चालू राहिले आहे.
खरंतर या परिसरातील नागरिक सर्वात जास्त व नियमित नगरपरिषदेचा कर भरत असतात तरी देखील या भागातील नागरिकांवर हा अन्याय होत आहे. तरी हा अन्याय दूर करून नियमित योग्य दाबाने एक तास पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी राहुलभैय्या निंबाळकर यांनी केली आहे.
No comments