राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत परराज्यातील दारू, ४ वाहनांसह ४० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
मुंबई, दि. ८ :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परराज्यातील दारू तसेच ४ वाहनांसह ४० लाख ६४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क, मुंबई विभागाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, अधीक्षक, चरणसिंग राजपूत, उप-अधीक्षक, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डी विभागाकडून २७ ऑक्टोबर २०२४ रोजी घोटावडे गावच्या हद्दीत, आंबटवेट रोडवर दारूबंदी गुन्ह्याकामी सापळा लावून टाटा कंपनीचे एस गोल्ड या प्रकाराचे चारचाकी वाहन क्र. MH १२ TV५१२२ पकडले. या वाहनामधून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली विदेशी दारूचे एकूण १८ बॉक्स (८६६ सिलबंद बाटल्या) तसेच महाराष्ट्र राज्याचे बनावट लेबल असा एकूण ३ लाख ५५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीस ३ दिवस एक्साईज कोठडी मंजूर केली. पुढील तपासात ४ नोव्हेंबर २०२४ रोजी कोथरूड, कर्वे पुतळ्याजवळ तपासाकामी छापा टाकला असता सदर गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे विविध बॅन्डचे विदेशी मद्याचे एकूण १०,००० नग बनावट लेबलसह सापडले आहे. याची एकूण किंमत ८८,१६० रुपये आहे. या गुन्ह्यातील पुढील तपासात दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी शनिवार पेठ, येथून बनावट लेबल छपाई करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मशीनसह एकूण ३० लाख २ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात एकूण ३४ लाख ४५ हजार ५५० रुपयांच्या मुद्देमालासह एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग सचिन श्रीवास्तव, ई विभागाचे निरीक्षक, शैलेश शिंदे, स.दु.नि. स्वप्नील दरेकर, स.दु.नि.सागर धुर्वे, जवान श्री. गजानन सोळंके, जवान श्री. संजय गोरे, यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असून पुढील तपास निरीक्षक, सचिन श्रीवास्तव करीत आहेत.
या विभागाने १ ऑक्टोबर २०२४ पासून आजपर्यंत एकूण ३१ गुन्हे नोंद करून ३१ आरोपींना अटक करून ४ वाहनांसह एकूण ४० लाख ६४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गावठी दारू ९९१ लिटर, कच्चे रसायन १६०० लिटर, ताडी २२७ लिटर, देशी दारू ३३.०० ब. लि., बिअर २५५ ब. लि. व परराज्यातील गोवा निर्मित मद्य एकूण १५५.८८ ब. लि. यांचा समावेश आहे. ही कारवाई विभागाचे दुय्यम निरीक्षक विजय सूर्यवंशी, गणपती थोरात, श्रीमती शीतल देशमुख जवान श्रीमती वृषाली भिटे यांनी केली केली.
No comments