फलटणमध्ये सत्ता परिवर्तन ; महायुतीचे सचिन पाटील विजयी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ – अत्यंत चुरशीच्या झालेल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांनी विद्यमान आमदार दिपक चव्हाण यांचा १७०४६ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे. फलटण तालुक्यात २९ वर्षांनी राजे गटाच्या हातून विधानसभेची सत्ता गेली आहे. माजी खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा नेतृत्वाखाली खासदार गटाने परिवर्तन घडवित लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला आहे.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची व दोन्ही नाईक निंबाळकर घराण्याची प्रतिष्ठेची झालेली होती. गेली २९ वर्ष फलटण तालुक्यावर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांची एक हाती सत्ता आहे, मात्र या विधानसभा निवडणुकीत या सत्तेला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी छेद देत त्यांचे कट्टर समर्थक सचिन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आणलेले आहे. आज सकाळी येथील शासकीय गोदामामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील यांनी घेतलेली आघाडी आमदार दीपक चव्हाण यांना तोडता आली नाही, ही आघाडी हळूहळू सचिन पाटील यांनी वाढवत नेली. जस जसी आघाडी वाढू लागली तसतसे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला कार्यकर्त्यांनी फलटण शहरात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच गुलालांची जोरदार उधळण करीत रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
फलटण तालुक्याच्या इतिहासात आत्तापर्यंत तीन वेळा आमदार केल्यानंतर चौथ्यांदा आमदार करण्याची संधी फलटणकरांनी कोणालाही दिलेली नाही. चौथ्यांदा आमदारकी निवडणुकीत उतरलेले दीपक चव्हाण यांना त्यामुळे पराभवाचा झटका बसला आहे.सचिन पाटील यांना १,१९,२८७, दिपक चव्हाण यांना १,०२,२४१ मते मिळाली तर दिगंबर आगवणे यांना १३,८२८ मते मिळाली.
No comments