Breaking News

अजितदादांच्या रामराजेंवरील टीकेला, शरद पवारांनी दिले उत्तर

Sharad Pawar responded to Ajitdad's criticism of Ramraj

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १७ : राज्य सरकारच्या एका नेत्याने साखरवाडी येथे रामराजेंवर टीका केली, टीका करत असताना, त्यांनी सांगितले की रामराजेंना मी आमदार केले. पण ही मोठी गंमतीची गोष्ट आहे, कारण पक्षाचा अध्यक्ष मी, पक्षात कोणाला तिकीट द्यायचा ? तो अधिकार माझ्याकडे, ज्यांनी, मी रामराजे यांना आमदार केलले असे सांगितले त्यांनाही पहिले तिकीट मीच दिले आहे. त्यांना मंत्रिमंडळा मध्ये आम्ही लोकांनी घेतलं, आणि त्यांनी सांगावं, की रामराजे यांना मी तिकीट दिले,  माझं नशीब चांगलं आहे, की त्यांनी असे सांगितले नाही की, पवार साहेबांना देखील मी आमदार केले असा खोचक टोला अजित पवार यांना लहवून, पुढे कसं बोलावं ? काय बोलावं? हे समजलं पाहिजे, हे योग्य नाही, राजकीय मतभेद असतात पण एकमेकांचा सन्मान ठेवायचा असतो, रामराजे हे विधिमंडळाचे सदस्य आहेत,  पदाचा सन्मान ठेवला पाहिजे, पदाची प्रतिष्ठा आपण ठेवली पाहिजे, आपण तसं बोललं तर इतर लोकही त्याच भावनेने आपल्याला बोलत राहतात आणि उगीचच कुणावर टीका टीपणी करणे हे बरोबर नाही अशी कान उघडणी करून, रामराजे हे पहिल्यांदा आमदार झाले ते स्वतःच्या कर्तुत्वाने झाले, कोणाच्याही मदतीशिवाय अपक्ष आमदार झाले आणि नंतरच्या काळामध्ये देखील त्यांनी पक्षाचे विचार सर्वत्र पोहोचवण्यास मदत केली, व त्यांची ताकदीचा पक्षासाठी उपयोग केला. सभापती पदाचा चर्चा चालू होती त्यावेळी सगळ्यांकडून एकच नाव पुढे आले ते म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर.  त्यामुळे कृपा करून कोणी असे सांगत बसू नये, की मी रामराजेंना आमदार केलं! सभापती केलं! असे खडे बोल, अजित पवार यांचे नाव न घेता खासदार शरद पवार यांनी सुनावले.

    महाराष्ट्रात आज महिला सुरक्षित नाहीत, शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, तरुणांना उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीच्या संधी उपलब्ध नाही, समाजातील हे तीन प्रमुख घटक दुर्लक्षित असताना लाडकी बहीण सारख्या योजना आखून सरकार मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत आपल्या हिताची जर कोणी खबरदारी घेणार नसेल, तर त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही अशी भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेला घ्यावी लागेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले.

    फलटण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित फलटण येथील जाहीर सभेत, ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, सह्याद्री कदम, महेंद्र सूर्यवंशी बेडके, विकास शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

    या निवडणुकीमध्ये येत्या ५ वर्षासाठी महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा आणि राज्य कसं चालवायचं याचा विचार करण्याबद्दलची ही वेळ आहे असे स्पष्ट करून शरद पवार म्हणाले, नुकतीच जी लोकसभा निवडणूक पार पडली, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सांगत होते की, माझ्या पक्षाला माझ्या नेतृत्वाखाली चारशे जागा निवडून द्या.  आम्हा विचार करत होतो की सरकार चालवायला पुरेसे संख्याबळ नसले तरी अन्य मदत घेऊन ते चालवता येते. पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांचेही सरकार बहुमतामध्ये नव्हतं, मी या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होतो. तरीही हे सरकार आम्ही पाच वर्षे चालवलं. परंतु सर्व आलबेल असताना पंतप्रधान मोदी हे चारशे जागांचा आग्रह का करीत आहेत याचा आम्ही विचार करत होतो. त्याच्यानंतर आमची चर्चा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली आणि जर या घटनेमध्ये बदल करायचे असतील तर एवढ्या मोठ्या संख्येने खासदार निवडून येणं गरजेच आहे. नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये बाबासाहेबांच्या घटनेमध्ये बदल करण्याचा विचार असावा, ही शंका आम्हा लोकांना आली म्हणून दिल्लीमध्ये आम्ही लोक एकत्र आलो. त्यामध्ये माझ्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, चार राज्यांचे मुख्यमंत्री होते, आम्ही ठरवलं की आपण एक राहिले पाहिजे. जर आपण एक राहिलो नाही तर संविधान बदलले जाईल, त्यासाठी आपण एक राहूया व समाजासमोर मत मागण्यासाठी जाऊया. त्यानुसार आम्ही लोकांनी तुमच्याकडे मतांची मागणी केली आणि मला तुमचा अभिमान आहे की, या कामामध्ये महाराष्ट्राने फार मोठा पुढाकार घेतला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीस खासदार जनतेने निवडून दिले. अन्य राज्यांमधेही याच पद्धतीचा प्रतिसाद मिळाला त्यामुळे आता जर संविधानामध्ये बदल करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार असेल तर तो कृतीमध्ये येऊ शकणार नाही असेही पवार यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

    महाराष्ट्रात भाजप राजवटीच्या कालावधीत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात स्त्रियांवर ६७ हजार ३८१ एवढे अत्याचार झाले. या आकडेवारी नुसार दर तासाला पाच स्त्रियांवर अत्याचार होत होते, अन्याय होत होता ही अशी अवस्था आपणास पहावयास मिळते. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी मुली आणि महिला बेपत्ता झाल्याचे उदाहरण पाहायला मिळत होते. सरकारच्या वतीने याबाबत माहिती घेतली असता या राज्यामध्ये ६४ हजार मुली बेपत्ता होत्या, याचा अर्थ असा की या देशांमध्ये, राज्यामध्ये स्त्रियांची सुरक्षा नाही. सरकारने एका बाजूला लाडक्या बहिणींसाठी दीड हजार रुपये देण्याविषयीची योजना दिली. एका बाजूला दीड हजार द्यायचे व दुसऱ्या बाजूला काही हजार मुली, लाडक्या बहिणी बेपत्ता झालेल्या बघायचं असा स्त्रितत्वाचा अपमान या देशांमध्ये यापूर्वी कधी झाला नाही. आज भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे, त्यांचे सरकार आहे. त्यांच्या हाती सत्ता आहे त्या सत्तेचा उपयोग महिलांच्या सुरक्षेसाठी करण्याऐवजी त्यांना संकटात नेण्याचे पाप भाजप सरकारच्या कालखंडात झाल्याचा आरोप यावेळी पवार यांनी केला.

    शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले, भाजप सरकारच्या कालावधीत राज्यात अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.  नैसर्गिक आपत्ती व आर्थिक कर्ज फेडता येत नाही. त्याच्या शेतमालाची किंमत मिळत नाही म्हणून त्याला जीव द्यावा लागतो आणि जे राज्यकर्ते आहेत ते या शेतकऱ्यांच्या दुःखाकडे बघायला तयार नाहीत, अशी आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आहे. तरुणांच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले, राज्यात ठिकठिकाणी कॉलेज आहेत, मुलं शिकत आहेत त्याचा आनंद आपणास सर्वांना आहे. परंतु पदवीधर झाल्यानंतर पुढे काय ? अनेक तरुणाना काम करण्याची इच्छा असताना त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही नोकरी न मिळाल्याने या तरुणांना निराशेला तोंड द्यावे लागते. ज्या समाजामधली तरुण पिढी निराश आहे, त्या समाजाचे भवितव्य हे सुद्धा नैराश्याकडे जाते त्यामुळे महिला, शेतकरी व तरुण या सर्वांच्या कडे जे दुर्लक्ष करतात आणि तेच लोक तुमच्याकडे मतांची मागणी करण्यासाठी येतात. त्यामुळे तुम्ही आमचे हित पाहत नाही, म्हणून तुम्हाला आम्ही पाठिंबा देणार नाही अशी ठाम भूमिका महाराष्ट्रातील जनता घेईल असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments