Breaking News

उदयनराजे यांची साताऱ्यात संतप्त टीका

Udayanaraje's angry criticism in Satara

    सातारा ( प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची आणि चीड आणणारी मुक्ताफळे उधळणाऱ्या राहुल गांधी आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांवर बहिष्कार  घालायला हवा. राहुल गांधींनी छत्रपती बद्दल केलेल्या विधानांचा समाचार घेताना  खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना आक्रमक झाले होते.

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी इंग्रजांना राज्य प्रस्थापित करण्यासाठी मदत केली. त्यांच्याबरोबर भागीदारी केली आणि ते हे सर्व करत नव्हते म्हणून त्यांना इंग्रजांनी बक्षीसी दिल्याचे चुकीचे विधान राहुल गांधी यांनी त्यांच्या समाज माध्यमावर आणि ट्विटरवर केले आहे.

    हिंदुस्तान वर आक्रमण करणाऱ्या सर्व राजांनी त्यांचे साम्राज्य वाढवण्यासाठी लढाया केल्या, देशाची लूट केली. मोठ्या प्रमाणात धर्मांतरे केली आणि समाजावर अन्याय केला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेवर होणाऱ्या अन्याया विरोधात लढा उभारून स्वराज्य स्थापन केले. त्यांनी कोणाशीही तडजोड केली नाही. सर्वधर्मीयांना  राज्यकारभारात सहभागी करून घेतले. त्यांना विचार दिला. त्या आधारावर त्यांनी समाजाची एकजूट करून परकीय आक्रमणे परतवून लावली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलून त्यांनी देशाचा आणि राज्याचा अपमान केला आहे.  इंग्रज आणि पोर्तुगीजांना भारतात  एका जागेवर बसवायचे काम छत्रपतींनी केले. भविष्यकाळाचा विचार करून गड किल्ले, आरमार, जलनीती, लोकनीती राज्यकारभाराची पद्धत ठरविली.

    राहुल गांधी अतिशय चुकीची आणि घाणेरडी विधाने  करून छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आमच्या कुलदैवतांची बदनामी करत  आहेत. 

    छत्रपती शिवाजी महाराजांनी अफू लागवडीला प्रोत्साहन दिल्याचेही त्यांनी त्यात म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राहुल गांधी गलिच्छ आणि घाणेरडी भाषा, चुकीची विधाने  करून समाजामध्ये विचार, मनभेद आणि जातीजातीमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत.

    राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची मुक्ताफळे उधळली आहेत. देशातल्या महान युगपुरुषांबद्दल आदरयुक्त न बोलता  युगपुरुषांचा अपमान करत आहेत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदाना बद्दल काहीही माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया रचला. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका  घेतली. मात्र राहुल गांधींकडे युगपुरुषांबद्दल बोलताना कोणताही आचार विचार नाही. ते एका पक्षाचे कोणत्या विचारातून नेतृत्व करतात याविषयी त्यांनी शंका व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्याबद्दल सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने पोलिसात तक्रार न करता निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.

    राहुल गांधीच्या वक्तव्याबद्दल मी कार्यकर्त्यांना बोललो असतो तर साताऱ्यात आणि राज्यात उद्रेक आणि जाळपोळ होईल. यासाठी मी फक्त माध्यमाच्या प्रतिनिधींना बोलवून त्यांनी केलेल्या  चुका  समोर मांडत आहे. त्यांनी माफी मागायची  काहीही  गरज नाही असे स्पष्ट करून उदयनराजे यांनी  राज्यात आणि देशांत त्यांचे जे समर्थन करणारे लोक आहेत. त्यांच्यावर बहिष्कार घालायला हवा असे आवाहन केले.

    ही भाजपाची किंवा राजकीय पत्रकार परिषद नाही असे सुरुवातीलाच स्पष्ट करून, उदयनराजे यांनी राहुल गांधींवर आक्रमकपणे टीका केली. त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल सत्ताधारी किंवा विरोधक  एकही शब्द बोलत नाहीत याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.   छत्रपती शिवरायांच्या लोकशाही तून प्रेरणा घेऊन आजची लोकशाही उभी राहिली आहे. आजच्या लोकशाहीत अनेकांचे योगदान आहे. त्या सर्वांचा प्राणच  गांधीनी घेतला असल्याचे उदयनराजे म्हणाले. यावेळी सुनील काटकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

No comments