२९ वर्षे सत्ता श्रीमंतांकडे आहे मात्र फलटणचा विकास झाला नाही - अजित पवार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 18 : फलटण येथे जाहीर सभेत शरद पवार साहेबांना, मी श्रीमंताना आमदार केले असल्याच्या माझ्या वक्तव्याबद्दल खटकले, पण जर इथल्या श्रीमंतांना साहेबांनी आमदार केलं असेल, तर फलटण येथे झालेल्या साहेबांच्या सभेत श्रीमंत खूर्चीवर का बसले नाहीत? साहेब आले तरी तुम्ही स्टेजवर येत नाही याच्या मागची भानगड काय? याचं उत्तर श्रीमंतांना द्यावं लागेल, असा खोचक सवाल करून, १९९५ पासून श्रीमंतांच्या ताब्यामध्ये फलटणची सूत्रं आली. या गोष्टीला जवळपास २९ वर्षे झाली, २९ वर्षे ते म्हणतील तो आमदार, ते म्हणतील ते पालिका पदाधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी होते. ते प्रमुख असल्यामुळे श्रीमंतांच्या हातामध्ये इथल्या सगळ्या संस्था आहेत, पण असं असताना इथं विकास का झाला नाही? असा सवाल करत, महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन कांबळे पाटील यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
फलटण कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडलेल्या प्रचार सांगता सभेत ना. अजित पवार बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, उमेदवार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, माझी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, अॅड. नरसिंह निकम यांच्यासह महायुतीतील घटकपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तुम्ही नदी पलिकडच्या माझ्या बारामती तालुक्याशी फलटणची तुलना करा. मी १९९१ पासून काम करतोय आणि श्रीमंत १९९५ पासून काम करतात. आज माझ्या भागातला सोमेश्वर, माळेगाव कारखाना बघा. त्या कारखान्यांच्या तुलनेत तुमचा कारखाना ५०० रुपये ऊसाला कमी दर देतोय. तुम्ही श्रीरामांच्या नावाने काढलेला साखर कारखाना जवाहरला चालवायला देता हा कारखाना कधीही सभासदांच्या ताब्यात येणार नाही अशा पद्धतीने श्रीमंतांनी या कारखान्याचा करार करुन ठेवलाय, कारखान्याची जमिन विकली, कारखाना दुसऱ्याला चालवायला दिला. कारखाना कर्जातून बाहेर येणारच नाही असा करार केला. दूधसंघ बंद पाडलाय. खरेदी – विक्री संघाचे गोडाऊन गोविंद ला भाड्याने दिलेय. मार्केट कमिटीतील कामगारांचा पगार श्रीमंतांकडून होत नाहीये. मालोजीराजे बँक बुलढाणा बँकेला चालवायला दिलीय. आपण आज रस्त्यावर सभा घेतोय. इथं शहरात पटांगणं नाहीयेत. राजे आम्ही जर संस्था चांगल्या चालवू शकतो तर तुम्ही का चालवू शकत नाही? फलटणकरांनो तुमची सटकत नाही म्हणून त्यांचं हे सगळं चालतय. खरं तर फलटणकर एवढे दुधखुळे नाहीयेत. त्यांना सगळ समजतंय. आपला सचिन पाटील शेतकरी कुटूंबातला उमेदवार आहे. गेल्या तीन टर्म तुम्ही शिक्षकाला आमदार म्हणून निवडून दिलं. यावेळेला एकदा माझ्या आग्रहाखातर महायुतीच सरकार आणण्याकरिता तुम्ही सचिन पाटील यांना संधी द्या. मी सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे, असे आवाहनही ना. अजित पवार यांनी यावेळी केले.
रणजितदादा खासदार नसले तरी ते विकासकाम आणत आहेत. त्यांच्या केंद्र सरकारमध्ये चांगल्या ओळखी आहेत हे मला माहित आहे. पराभूत होवूनही ते काम करताहेत याचं कौतुक आहे. तुम्ही निवडून दिलेला खासदार तुमच्यासाठी काहीही करणार नाहीये. फलटण – बारामती रेल्वेसाठी मी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरला होता. हे चांगले काम एन.डी.ए. च्या सरकारमुळं झालं आहे, असेही ना. अजित पवार यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
इथल्या मुलांना चांगल्या शिक्षणासाठक्ष बारामतीला यावं लागतंय. यांच्या खासजी प्रकल्पांमुळं नदी प्रदूषित होतीय. त्यातून शेतीचं नुकसान होतय. फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील बरेच लोक रोज नोकरीसाठी बारामतीला येतायतं. कमिन्समध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर मुलांच्या पगारातले पैसे घेतोय. साखरवाडीच्या सभेत एकाने याबाबत उभं राहून सांगितलं तर त्याला किती दिवस त्यांनी गेटवर बसवून ठेवलं. ही परिस्थिती बदलायची संधी फलटणला आली आहे. ती तुम्ही स्विकारा मी तुम्हाला इथं विकास करुन दाखवतो, असे सांगून, होलार समाजाची आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची मागणी आहे ती पूर्ण करु. नाईकबोमवाडीच्या एमआयडीसीत उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न करु. तसेच श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या स्मारकासाठी आपण निधी देण्याचं काम करु. इथल्या बंद पडलेल्या संस्थांना चांगले नेतृत्त्व देवून त्या योग्य प्रकारे चालवून दाखवू, अशी ग्वाही यावेळी ना. अजित पवार यांनी दिली.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, गेली 15 वर्षे आम्ही फलटणची बारामती करु असंच सांगत आलोय. आर.टी.ओ. ऑफीस आणलं, जिल्हा सत्र न्यायालय, फलटण शहरातील रस्त्यांसाठी कोट्यावधीचा निधी आणला. फलटणच आणखीन वेगाने विकास करण्यासाठी नाईकबोमवाडीला एमआयडीसी मंजूर करुन आणलीय. या एमआयडीसीत उद्योग आणून तालुक्यातील युवकांना काम देण्याचं आमचा उद्देश आहे. त्यासाठी आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारांची मदत घ्यायचीय", असे सांगून "आत्ता असलेल्या फलटणच्या एमआयडीसीतील कंपनीतून निम्माच पगार कामगारांना मिळतो आणि निम्मा पगार श्रीमंतांच्या घरात जातो”, असा घणाघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. "फलटणच्या निष्क्रिय आमदाराला फलटणची जनता निवडून देणार नाही. श्रीमंतांवर बोलून विकास होणार नाही हे आम्हाला माहीत आहे. फलटणचा चौफेर विकास आम्हाला हवा आहे. त्यासाठी अजितदादांची साथ आपल्याला द्यायची आहे, असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी आवाहन केले.
सचिन पाटील म्हणाले, कंपनी बंद पाडणारी माणसं आम्ही नाही. आमच्या नेतृत्त्वाने स्वतःच्या जीवावर कारखाना उभा करुन तरुणांना रोजगार देण्याचं काम केलं आहे. नाईकबोमवाडीच्या एमआयडीसीला त्यांनी विरोध केला. तुम्हाला रोजगार मिळवून द्यायचा नाही. तुम्हाला राजकारणात गुंतवून त्यांना ठेवायचं आहे. रणजितदादांच्या नेतृत्त्वात रेल्वेची कामं सुरु आहेत, रस्त्याची काम सुरु आहेत. आमदार म्हणतात विकास कुठं दिसतं नाही; तुम्ही कधी मतदारसंघात फिरलाच नाही तर तुम्हाला विकास कसा दिसेल, अशी टिका करुन "एकदा संधी द्या तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करीन, अशी ग्वाही उमेदवार सचिन पाटील यांनी दिली.
No comments