Breaking News

फलटणला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सचिन पाटील यांना विजयी करा - अजित पवार

Win Sachin Patil to restore Phaltan's past glory - Ajit Pawar

    फलटण  (गंधवार्ता वृतसेवा) दि.१३  : सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आहे. सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असत, त्याची शिकवण चव्हाण यांनी आपणाला दिली आहे. त्या रस्त्याने गेलं तरच महाराष्ट्राचं भलं होणार आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी व आमच्या सरकारने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला आहे. विरोधक घाबरले आहेत ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या योजना या प्रत्यक्षात येऊच शकत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

    दरम्यान आपल्या भाषणात आमदार रामराराजे यांची विविध मुद्द्यावरून खिल्ली उडवत श्रीमंत तुमच्यात धमक नसल्यामुळेच संस्था चालवायला देताय का असा प्रश्न उपस्थित करत आता आमदारकीही चालवायला द्या असा टोला लागवला व फलटणला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सचिन पाटील यांना विजयी करा असे आवाहन केले.

    साखरवाडी ता. फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार नितीन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सचिन पाटील, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, माणिकराव सोनवलकर, बाळासाहेब सोळसकर, ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर, विश्वासराव भोसले, डी. के. पवार, विक्रम भोसले, ॲड. नरसिंह निकम, प्रतिभा शिंदे, चेतन शिंदे, मंगेश धुमाळ, राम निंबाळकर, शरयू साळुंखे-पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

    रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात जाणीवपूर्वक बदनामीच षडयंत्र विरोधक करत आहेत परंतु त्यावर कोणी विश्वास ठेऊ नये. ते जरी माजी खासदार असले तरी त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात चांगली ओळख आहे. त्यामुळे केंद्र स्तरावरील प्रश्न त्यांच्या व राज्य स्तरावरील प्रश्न आमच्या माध्यमातून मार्गी लावता येतील. फलटणच्या जनतेने आजवर चांगली व तोलामोलाची  माणसं नेतृत्व म्हणून दिली आहेत. रामराजे यांच्याकडे सूत्र दिल्यानंतर तालुक्याची चढती धुरा असायला हवी होती. परंतु तसें दिसून येत नाही. त्यांना विधानपरिषदेचे सभापाती केले, पालकमंत्री, इतर महत्वाची खाती या सगळ्या गोष्टी दिल्या, हे देत असताना आपण भेदभाव केला नाही असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. आमच्याकडे एकेकाळी अडचणीत असलेला सोमेश्वर कारखाना उत्तमपणे चालला आहे, तो माळेगाव प्रमाणे उसाला चांगला भावही देत आहे.

    परंतु तुमच्याकडे टणाला पाचशे रुपये कमी मिळत आहे. नाव श्रीरामाचं अन दिलाय चालवायला अशी टीका करून ते म्हणाले, कारखाना काढल्यानंतर सात वर्षात कारखान्याचे रिपेमेंट आम्ही काढतो व तो कर्जमुक्त करतो आणि हिथ तुम्ही पंचवीस अन तीस वर्ष चालवायला देताय असे आश्चर्य व्यक्त करून तुम्हाला का कारखाना चालवता येत नाही, कारखान्याच्या मोक्याच्या जमिनी विकुन ही कारखाना आवाडेंच्याच ताब्यात, एकेकाळी उर्जीतावस्थेत असणाऱ्या दूध संघाच्या जमिनीचा लिलाव झाला, खरेदी विक्री संघाची वाट लावलीत,  

    मालोजी बँक चालवायला दिलीत तर मग तुम्ही काय करताय, तुमच्यात संस्था चालवण्याची धमक आणि ताकद नाही का असा सवाल व्यक्त करून आता ते आमदारकीही चालवायला देणार आहेत असा टोलाही पवार यांनी आमदार रामराजे यांना लागवला. जर आमच्यापेक्षा पाचशे रुपयानी दर कमी मिळणार असेल तर आपण कसे उबजारी येणार हा विचार या तालुक्यातील शेतकरी करणार आहेत की नाही असा सवालही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

    दरवाजा लावून बैठका घेऊन चर्चा करतायत, हे श्रीमंतांना शोभत नाही, आपण श्रीमंत आहात, राजे आहात काय म्हणतील वरची लोकं असं चालत नाही असा टोला मारून, तुम्ही आता तिकडं गेलायत ना, जर तुमच्यात खरंच धमक व ताकत असेल तर तुम्ही आमदारकीला लाथ मारून तिकडं जावा मला काय वाटणार नाही. परंतु आमदारकीपण टिकवायची व वेगळ्या पद्धतीने प्रचार करायचा हे बरोबर नाही अशी नाराजी व्यक्त करून अजित पवार म्हणाले, काळानुरूप जुन्या लोकांनी थांबलं पाहिजे, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे आणि सचिन पाटील यांच्या रूपाने नवीन चेहरा जनतेसमोर आला आहे. फलटणला गतवैभव प्राप्त करून देण्याकरता एक सुवर्णसंधी फलटणकरांना व कोरेगावच्या पूर्व भागाला आलेली आहे. आता इतके दिवस तुम्ही श्रीमंतांचं ऐकल आता अजित पवाराच ऐका आणि घड्याळाच्या शेजारचं बटन दाबून सचिन पाटील यांना विजयी करा. फलटणच्या विकासाबाबत ज्या ज्या अडचणी सांगितल्या, त्या आम्ही सर्वजण ठराविक काळामध्ये मार्गी लावण्याचे काम करू अशी ग्वाहीही पवार यांनी यावेळी दिली.

    संजीवराजेही आमदार झाले असते..!

    मी संजूबाबा यांना विधानपरिषदेच तिकीट देत होतो. मी मागे लागलो होतो, त्यांना उभ करा म्हणून पण श्रीमंतच म्हणाले, नको त्याला नका उभा करू आणि मग शिखर गोरे यांना उभं केलं. मी सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला परंतु श्रीमंतांनी साथ दिली नाही. अन्यथा संजूबाबा देखील आमदार झाले असते. आम्ही दुजाभाव करत नाही सर्वांना संधी देतो असेही अजित पवार यांनी सांगितले.

    अजितदादांचा फलटणकरांना वादा 
* फलटण शहर स्वच्छ व सुंदर करून ग्रीन सिटी बनविणार 
* फलटण तालुका दुष्काळमुक्त करणार 
* महिलांसाठी विशेष सुविधा असणार आरोग्य केंद्र सुरु करू, उत्तम प्रतीची आरोग्य सेवा देऊ.
* फलटण शहरातील रस्ते खड्डे मुक्त करू 
* बारामतीच्या धर्तीवर फलटणचा विकास करून दाखवू.
* शेतकऱ्यांच्या शेत मालासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शीतगृह निर्माण करू 
* शेतकरी व प्रवाशांसाठी किसान रेल सुरु करण्याचा आम्ही प्रयत्न करू 
* एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी अद्यावत लायब्ररी 
* कमिन्स कंपनीतील भामिपुत्राना योग्य मानधन उपलब्ध करून देण्याचा वादा 
* युवकांसाठी अद्यावत क्रिडांगण 
* उत्तम दर्जाचे नाट्यसंकुल 
* तालुक्यात चांगल्या प्रकारचे शैक्षणिक संकुल 
* रोजगाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारे वेगवेगळे आयटीआय चे अभ्यासक्रम उपलब्ध करून देऊ 
* तालुक्यातील युवकांच्या रोजगाराच्या दृष्टीने नाईकबोमवाडी येथे औद्यागिक वसाहत सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार व तिथे चांगले प्रकल्प आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार 
* तालुक्यात नवीन महावितरण चे पॉवर स्टेशन निर्माण करू 
* फलटण बस स्थानकाचा कायापालट करू, तेथे चार्जिंग स्टेशन निर्माण करू 
* शहरात वीज पुरवठा करणाऱ्या तारा/वायर खंबावरती ने ठेवता त्या भूमिगत करू

 

No comments