निंभोरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास ३ कोटीचा निधी देणार : आमदार सचिन पाटील
फलटण : आज ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. ६ डिसेंबर १९५६ ला दादर येथील चौपाटीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिवावर लाखो अनुयायांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी फलटण मधील काही अनुयायांनी डॉ.बाबासाहेबांच्या अस्थी आपल्या निंभोरे ता.फलटण येथे आणल्या व त्यांचे जतन केले आहे. दरवर्षी १४ एप्रिल, ६ डिसेंबर या दिवशी फलटणसह तालुक्यातील अनेक गावांमधून भीमसैनिक निंभोरे या गावी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जातात. निंभोरे येथील या वास्तूला प्रती चैत्यभूमी या नावाने ओळखले जाते.
यावर्षी नवनिर्वाचित फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन कांबळे पाटील यांनी फलटण शहर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून निंभोरे या ठिकाणी जाऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचे दर्शन घेतले. यावेळी लोकांच्या मागणीचा विचार करून त्यांनी निंभोरे या गावी चैत्यभूमीच्या धर्तीवर नियोजित प्रति चैत्यभूमीसाठी ३ कोटी रुपयांचा निधी नवीन स्मरकासाठी आमदार फंडातून देण्याची घोषणा केली.त्यांच्या या घोषणेमुळे निंभोरेसह संपूर्ण तालुक्यातील भीम सैनिकांच्या वतीने त्याचे आभार मानण्यात आले.
यावेळी आमदार सचिन कांबळे पाटील, माजी नगरसेवक सचिन अहिवळे ,सामाजिक कार्यकर्ता सुधीर अहिवळे,कामगार संघटना अध्यक्ष सनी काकडे,निंभोरे ग्रामपंचायत सदस्य अमित रणवरे,धीरज कांबळे,भाजपा अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष राजेंद्र काकडे, सनी मोरे, विकी बोके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments