Breaking News

विज्ञान प्रदर्शनामुळे अविस्मरणीय वैज्ञानिक दृष्टीकोन प्राप्त होतो : प्राचार्य येवले

A science fair provides an unforgettable scientific perspective: The principal came

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ -: विज्ञान प्रदर्शनामुळे अविस्मरणीय वैज्ञानिक दृष्टीकोन प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आणून देत विद्यार्थी दशेतच  स्वतंत्र विचार करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन निवृत्त प्राचार्य रविंद्र येवले यांनी विद्यार्थ्यांना केले.

    सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग, सद्गुरु शिक्षण संस्था संचलित सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त सहभागाने श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संकुल येथे आयोजित ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य रविंद्र येवले यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले, त्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

    यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ, विस्तार अधिकारी चनय्या मठपती, दारासिंग निकाळजे, पारसे, श्रीमती माने, गटसमन्वयक दमयंती कुंभार, सर्व केंद्रप्रमुख, आनंदवन प्रा. विद्यामंदिरचे मुख्याध्यापक  प्रदीप चव्हाण, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नागेश पाठक यांच्यासह प्रदर्शनात सहभागी शाळांचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. 

    प्राचार्य येवले म्हणाले, गणितामध्ये तर्क करावा लागतो, तर्कासाठी विचार करावा लागतो, विद्यार्थ्यांच्या अंगी सृजनशीलता, विज्ञान, गणिती विज्ञान रुजावे, विद्यार्थ्यांमध्ये उत्तम बुद्धिमत्ता असावी, ती सर्वात चांगली देणगी आहे, त्याची जोपासना करा.

    तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विषयाबाबत प्राचार्य येवले यांनी विषयवार खुली चर्चा केली तसेच जेम्स वॅट व इतर शास्त्रज्ञांनी शोध कसे लावले याची माहिती देत आपल्या विनोदी शैलीने त्यांनी उपस्थितांना खळखळून हसायला लावले.

    प्रारंभी गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात ३ दिवस चालणाऱ्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी प्राथमिक व माध्यमिक शाळा, त्यांनी सादर केलेली वैज्ञानिक उपकरणे व अन्य माहिती दिली. प्रदर्शनामध्ये बालवैज्ञानिकास संधी मिळते त्यातून त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    प्रदर्शनाच्या आयोजनासाठी संस्था चालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रारंभी प्रमुख उद्घाटक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम व श्री सद्गुरु हरिबुवा महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

    विज्ञान प्रदर्शनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या हॅपी फ्रेंड्स, चांद्रयान ३, स्वच्छ भारत सुंदर भारत, प्रदूषण या विषयावर आधारित हस्त पुस्तिकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित नाटिका सादर केली.

    मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण व नागेश पाठक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मृणाल प्रभुणे यांनी सूत्रसंचालन, मुख्याध्यापक  प्रदीप चव्हाण यांनी समारोप व आभार मानले.

No comments