देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री - फलटणमध्ये जल्लोष ; शेतकरी - युवकांचे प्रश्न सोडवण्याचे काम महायुती सरकार ताकतीने करेल - आ.सचिन पाटील
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.४ - महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला मोठे यश संपादन करून दिलं. शेतकरी वर्ग, तरुण वर्ग, सर्व जनता तसेच लाडक्या बहिणीचा पाठिंबा महायुतीच्या पाठीमागे होता त्यामुळेच हे यश संपादन करू शकलो. उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील तर आमचे नेते अजितदादा पवार व एकनाथराव शिंदे हे देखील हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सांगतानाच महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आमदार सचिन पाटील यांनी आभार मानुन, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचे काम महायुती सरकार ताकतीने करेल अशी ग्वाही दिली.
देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत जयकुमार शिंदे, अशोक जाधव, अनुप शहा, बजरंग गावडे, अमोल सस्ते, जाकीरभाई मणेर व इतर मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने खूप ताकतीने आपली विकासकामे करता येणार आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. तसेच आमदार सचिन पाटील व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचेही विकास कामासाठी योगदान आपल्याला मिळणार असल्याचे सांगून, देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचा आनंद होत आहे, तमाम फलटणकरांच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करत असल्याची प्रतिक्रिया जयकुमार शिंदे यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवरायांना अपेक्षित असणारे जनतेचे राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारी लोकशाही व वीर सावरकरांना अपेक्षित असणारे स्वातंत्र्य या महायुती शासनाकडून महाराष्ट्रातील जनतेला नक्की मिळेल. नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील विकासाचे पर्व सुरू झाल्याचे दिसून येईल तसेच माजी खासदार रणजितदादा व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा या दोघांची ताकद मिळून त्या माध्यमातून आपल्या फलटण तालुक्याचा विकास होणार असल्याचे अनुप शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.
No comments