Breaking News

जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी - खासदार उदयनराजे यांचे ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन

Demand for repairs of postal buildings in the district - MP Udayanaraje's statement to Jyotiraditya Scindia

    सातारा दि २० ( प्रतिनिधी )सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील बागलेवाडी येथे तसेच खटाव तालुक्यातील मांजरवाडी या दोन ठिकाणी उच्य  क्षमतेचे मोबाईल टॉवर उभारावेत. सातारा जिल्हयातील बीएसएनएलच्या इमारतींच्या देखभाल दुरुस्ती तसेच नुतनीकरणासाठी तातडीने निधी वितरीत करावा. डाक विभागातील कर्मचा-यांची कार्यक्षमता वाढण्याकरीता आणि  नागरीकांना पोस्ट खात्याच्या व इतर  सुविधा चांगल्या पध्दतीने उपलब्ध होण्यासाठी  जिल्हयातील महाबळेश्वर-पांचगणीसह अन्य ठिकाणाच्या डाक विभागाच्या जीर्ण झालेल्या इमारतींची व्यावसायिक दृष्टीकोनामधुन नव्याने पुर्नउभारणी करावी अश्या मागण्या आज समक्ष भेट घेवून, खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ना.ज्योतिरादित्य सिंदीया यांचेकडे केल्या.

    यावेळी दिलेल्या निवेदनात खासदार  उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की, ग्रामस्थ- नागरीकांसाठी सध्याच्या गतीमान आणि डिजीटल युगामध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटी गरज बनली आहे. स्पर्धात्मक जगात खाजगी कंपन्या इतकीच सरकारी कंपनी असलेल्या दूरसंचार विभागा मार्फत देशाच्या कानाकोप-यात मोबीलिटी आणि नेटवर्क कनेक्टीव्हीटी पुरविणे अपेक्षित आहे. सातारा जिल्हयातील पाटण,सातारा,जावली,वाई भागातील अनेक गावे दुर्गम आणि अतिडोंगराळ भागात वसलेली आहेत. डिजिटल एज्युकेशन आणि डिजिटल इंडीया मुळे मोबाईल वरुन अनेकानेक सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध होण्यासाठी मोबाईल कनेक्टीव्हीटी सक्षम आणि दर्जेदार असणे अनन्यसाधारण बनले आहे. म्हणूनच पाटण तालुक्यातील बागलेवाडी येथे तसेच खटाव तालुक्यातील मांजरवाडी येथील ग्रामस्थांनी याकरीता उच्य क्षमतेचे मोबाईल टॉवर उभारणेची मागणी आमचेकडे केली आहे. या टॉवर्समुळे येथील पंचक्रोशीला लाभ मिळणार असल्याने सदरचे टॉवर उभारले जावेत.

    तसेच सध्या पोस्ट खात्याने टपाल-पार्सल, सेव्हींग्ज-इनव्हेसमेंट  सुविधे बरोबरच बँकिंग सेवेमध्येही गती घेतली आहे. जन माणसामध्ये पोस्टखात्याची विश्वासार्हता अधिक असल्याने,  या नवनवीन  सुविधांचा देशातील नागरीकांना विशेष लाभ होत आहे.तथापि ‍जिल्हयातील पोस्टखात्याच्या काही  इमारतींची दयनीय अवस्था आहे याबद्दल खेद वाटतो. महाबळेश्वर आणि पांचगणी येथील मुख्य बाजारपेठेत असणा-या पोस्टच्या इमारती जीर्णावस्थेत आहेत. तीच परिस्थिती थोडया फार फरकाने कराड पोस्ट इमारतीची आहे. आमच्या मागणीवरुन सातारा मध्यवर्ती पोस्टकार्यालयाचे नुतनीकरण आणि अदयावतीकरण करण्यात आले, त्याप्रमाणे कराड पोस्ट कार्यालयाचे नुतनीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा,  महाबळेश्वर,पांचगणी व  अन्य ठिकाणच्या पोस्ट इमारतींचे पुर्ननिर्माण करावे. त्यामुळे डाक कर्मचा-यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल शिवाय नागरीकांना पोस्टमार्फत चांगल्या पध्दतीने सुविधा मिळण्याबरोबरच अन्य आवश्यक  सुविधा मिळु शकणार आहेत.

    तसेच सातारा जिल्हयातील भारत संचार नगर निगम अर्थात बीएसएनएलच्या  सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर येथील कार्यालय इमारती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. या इमारतींची देखभाल दुरुस्ती गेल्या कित्येक वर्षात झालेली नाही. या इमारतींच्या देखभाल दुरुस्ती तसेच नुतनीकरणासाठी तातडीने निधी वितरीत करावा अशी मागणी देखिल खासदार उदयनराजे भोसले यांनी ना. ज्योतिरादित्य सिंदीया यांचेकडे केली आहे.

    दरम्यान, केंद्राच्या अखत्यारितील दुर्लक्षित ठरलेल्या बीएसएनएल आणि पोस्ट खात्याच्या इमारतींबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी उपाययोजना सुचवून, ग्रामस्थ नागरीकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी केलेला पाठपुरावा निश्चितच स्वागतार्ह आहे अशी प्रतिक्रीया ग्रामस्थ नागरीकांमधुन उमटत आहे.या प्रसंगी काका धुमाळ, ॲड.विनित पाटील, दिल्ली येथील स्वीयसहाय्यक करण यादव उपस्थित होते.

No comments