भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान - फलटण येथील साहित्यिक संवाद कार्यक्रमात सुर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ - भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. लोकशाहीत लोकांच्या मतांचा आदर केला जातो. गरीब असो की गर्भ श्रीमंत लोकशाहीचा उत्सव निवडणूक यामध्ये समान पातळीवर असतात. आपल्या देशात अवमूल्यांचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. त्यातून आपली खरी प्रगती अधोगती लक्षात येईल. जोपर्यंत भारत देशात निवडणुकीचा उत्सव साजरा होत आहे तोपर्यंत लोकशाही अस्तित्वात राहील. लोकशाहीचा आत्मा म्हणजे निवडणुका यामध्ये पात्र मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने उत्साहाने सहभागी व्हावे मतदान करावे व मतदानाचा टक्का वाढवावा. यावर लोकशाहीचे यश अवलंबून आहे. भारत देशाचे संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. त्यातील प्रत्येक कलम महत्त्वाचे आहे. त्यामुळेच वेळोवेळी निवडणुकीचा उत्सव साजरा केला जातो. तसेच सध्याची तरुणाई नशेच्या आहारी जाऊ लागली आहे तिला नशेत अडकवले जात आहे असे चित्र दिसत आहे यामुळे विकृती निर्माण होऊन आत्महत्या वाढत आहेत. बदलती जीवनशैली तरुणाईला नशेच्या खाईत लोटत आहे. हे फार भयंकर आहे असा सूर नाना नानी पार्क फलटण येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्यिक संवाद कार्यक्रमात उमटला.
साहित्यिक संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, प्रा. सुधीर इंगळे, युवा साहित्यिक विकास शिंदे, श्रीनिवास लोंढे,सुरेश भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी युवा कवी अविनाश चव्हाण यांनी उमाळा तर प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी झेप या कवितामधून युवा पिढीला प्रेरणा दिली.
यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणुन केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. यामुळे देशातील प्रत्येक विद्यापीठात मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू होऊन मराठी साहित्य भारतभरातील विविध भाषेत भाषांतरीत होईल. याचा फायदा सर्वसामान्य मराठी साहित्यिकांस होईल,देशभर साहित्याचा प्रसार व प्रचार देशभर होईल.
यावेळी साहित्यिक संवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व साहित्यिक संवाद कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे आभार प्रा.श्रेयस कांबळे यांनी मानले. यावेळी फलटण तालुक्यातील साहित्यिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
No comments