Breaking News

शासकीय नोकऱ्यांमध्ये नवनियुक्तांनी आपल्या अंगभूत तसेच व्यक्तिगत कौशल्याचा विकास करून केवळ नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

New recruits in government jobs should develop their inherent as well as personal skills to become job givers and not job seekers - Union Minister Nitin Gadkari

    पुणे, 23 डिसेंबर 2024 - पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत असून युवकांना राष्ट्रउभारणी आणि आत्मसक्षमीकरणात योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून त्यांना सक्षम करेल.

    देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळा आयोजित करण्यात आला. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी ही भरती होत आहे.  देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी गृह मंत्रालय, टपाल विभाग, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, यासह विविध मंत्रालये किंवा विभागांमध्ये सामील होतील. महाराष्ट्रातही नागपूर आणि पुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

    आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा , विश्वसनीयता आणि पारदर्शकता ही क्षमता आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये नवनियुक्तांनी आपल्या अंगभूत तसेच व्यक्तिगत कौशल्याचा विकास करून केवळ नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरच्या केंद्रीय राखीव पोलीस दल ग्रुप सेंटर हिंगणा येथे आयोजित रोजगार मेळाव्यात केले. या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. सुमारे 257 जणांना नागपूर मधील रोजगार मेळाव्यात गडकरींच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले. यात सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, रेल्वे, पोस्ट डिपार्टमेंट, बँक या विभागातील उमेदवारांचा समावेश आहे .

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2047 सालापर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी देशाच्या युवा वर्गावर आहे आणि आपल्याला एक अतिशय उत्तम संधी पंतप्रधानांनी दिली असून युवा वर्ग या संधीचे नक्कीच सोने करेल, असा विश्वास केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. पुण्यामध्ये तळेगाव येथे सीआरपीएफ ग्रुप सेंटर येथे आज रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात ते बोलत होते. आज देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन होत असून 71,000 पेक्षा जास्त नवनियुक्तांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. या मेळाव्यांचा एक भाग म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी सुमारे 500 नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मोहोळ यांनी गेल्या 10 वर्षात झालेल्या बदलांचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या 10 वर्षात जागतिक स्तरावर आपल्या देशाचे नाव मोठे झाले आहे.

    पंतप्रधानांनी देशातील प्रत्येक घटकाचा विचार केला आहे. देशातील निम्म्याहून जास्त लोकसंख्या पंतप्रधानांनी सुरू  केलेल्या कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे, असे मोहोळ म्हणाले. भारत हा जगातील सर्वात तरुण लोकसंख्येचा देश आहे, त्यामुळे पंतप्रधानांची संपूर्ण भिस्त तरुण वर्गावर आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गेल्या दहा वर्षात 12 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून सुमारे साडेसात लाख रोजगार देण्यात आले, अशी माहिती मोहोळ यांनी दिली. देशाच्या विविध सरकारी विभागांमध्ये मिळणाऱ्या या रोजगारांमुळे युवा वर्गाला देशाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातील तरुणांनाही खूप चांगल्या प्रमाणात रोजगार मिळाले असल्याचे या नियुक्तीपत्रांच्या यादीतून आपल्याला दिसत आहे आणि याचा आपल्याला अभिमान आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. आपला युवा वर्ग म्हणजे देशाची दिशा, देशाची शक्ती आणि  देशाचे भविष्य आहेत, त्यांनी आपली जबाबदारी ओळखावी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यामध्ये पुरेपूर योगदान द्यावे, असे आवाहन मोहोळ यांनी केले.

    या रोजगार मेळाव्यात केंद्र सरकारच्या विविध विभाग/संस्था (बीएसएफ, एसएसबी, आयटीबीपी, सीआरपीएफ, एआर, बीआरओ, इंडियन पोस्ट, एसबीआय, बँक ऑफ इंडिया, , कॅनरा बँक, आयएमयू, सीपीडब्लूडी) मधील सुमारे 500 उमेदवारांना नियुक्ती पत्रे प्राप्त करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. के.के. पांडे, डीआयजी आयआयएम सीआरपीएफ पुणे,  जलज सिन्हा, डीआयजी (मेडिकल) सीएच, सीआरपीएफ पुणे आणि इतर अधिकाऱ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सर्व नवनियुक्त उमेदवारांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी  दीपक एस पाटील, (AGM) BOM, हरीश उपाध्याय, उपनिबंधक आणि इतर विभाग/संस्थांचे अधिकारी देखील आपापल्या विभाग/संस्थेच्या वतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

No comments