मा.खा.रणजितसिंह व आ.सचिन पाटील यांच्याकडून फलटणच्या भुयारी गटार, स्ट्रीट लाईट,नगर रचना विभागाचा पंचनामा ; फलटण शहरातील सर्व रस्ते काँक्रीटचे करणार - रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ - फलटण शहर हे माझे घर असून ते स्वच्छ व सुंदर बनविणार आहे. नगरपालिकेची सत्ता आल्यास दोन वर्षात संपूर्ण शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून वार्षिक कर कमी करणार आहे. येत्या काही दिवसात शहरात महिलां व पुरुषांसाठी स्वच्छतागृह तातडीने उभारण्याच्या सूचना देतानाच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी फलटण शहरात राबवण्यात आलेली भुयारी गटार योजना, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, शहरातील स्ट्रीट लाईट व नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत, संबंधित विभागांचा पंचनामा केला. पुढील दहा दिवसांनी नगर कॉलिंग च्या सर्व विभागांची पुन्हा आढावा बैठक घेणार असल्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी जाहीर केले.
फलटण नगरपालिकेच्या सभागृहात आमदार सचिन पाटील यांनी शहरातील विविध विकास कामे आणि वाहतूक समस्येवर चर्चा करण्यासाठी फलटण नगरपालिकेत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. मुख्याधिकारी निखिल मोरे, नगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सचिन पाटील यांनी फलटण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची आवश्यकता असून महिलांची प्रचंड कुचंबना होत आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात शहरात महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचे आदेश मुख्याधिकारी निखिल मोरे यांना दिले.
फलटण शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामासंदर्भात माहिती आमदार सचिन पाटील यांनी मागितली असता याची कामे अर्धवट असल्याचे आणि बंद असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर भुयारी गटार योजनेमुळे शहराचे वाटोळे झालेले आहे. या कामा संदर्भात अनेक तक्रारी असल्याने याची त्वरित श्वेतपत्रिका काढून वस्तुस्थिती जनतेसमोर आणा असे आदेश आमदार सचिन पाटील यांनी दिले.
फलटण शहरामध्ये पार्किंगच्या जागेत अनेकांनी अतिक्रमण केले असून वाहने रस्त्यावर येत आहे त्यामुळे ज्यांनी पार्किंगच्या जागेत अतिक्रमण करून गाळे काढलेले आहेत अशा ठिकाणी जाऊन तेथील बेकायदा पार्किंग काढून टाकावे. यापुढे पार्किंग साठी जागा सोडली असल्यासच परवानगी द्यावी असे आदेश आ.सचिन पाटील यांनी दिले.
यावेळी विविध खात्यांचा आढावा घेत असताना माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात प्रत्येक खात्यासंदर्भात बारकाईने माहिती घेताना स्वतः जवळची माहितीसुद्धा देऊन उपस्थित अधिकाऱ्यांना अचंबित केले.
फलटण शहरातील भुयारी गटारी योजना ही भुयारी गटारी योजना आहे की मलनिसारण योजना आहे याचे उत्तर अधिकारी वर्गाला स्पष्टपणे देता आले नाही.
फलटण शहरातील अतिक्रमणे व घाणीचे साम्राज्य यावर तीव्र नाराजी व्यक्त करताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यासंदर्भात तातडीने कारवाई करावी तसेच जे ओपन स्पेस आहेत ते तातडीने मुख्याधिकारी यांच्या नावावर करून घेण्याची मागणी केली. या ओपन स्पेसच्या जागेवर विविध निधी खर्च टाकून बाग, बगीचा, इतर सोई सुविधा आणि मोठे सिटी हॉस्पिटल उपलब्ध करून देण्याची ग्वाही रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण नगरपालिकेमध्ये 23 कर्मचारी डमी असून जे परमनंट आहेत ते दुसऱ्याला काम करायला नेमून त्यांना कामे करायला लावतात अशांना कामावरून त्वरित कमी करून जे डमी 23 कर्मचारी काम करतात त्यांना कामावर घ्या असे आवाहन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण शहर हे माझे घर असून या शहराचा विकास करण्याचा शब्द मी प्रचार सभेमध्ये दिलेला होता. त्यामुळे शहराच्या विकासाची जबाबदारी आपण घेतली असून येत्या दहा दिवसात फलटण शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये फिरून तेथील समस्या मी व आमदार सचिन पाटील हे जाणून घेणार आहोत आणि त्या समस्या जागच्या जागी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नगरपालिकेच्या कारभारात सुधारणा होणे गरजेचे असून येत्या दहा दिवसात पुन्हा नगरपालिकेची बैठक घेऊन सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहे. शहरासाठी भूमिगत इलेक्ट्रिक लाईन मंजूर झाल्याने आता तारांचा त्रास होणार नाही. सब स्टेशन मंजूर झाल्याने विद्युत पुरवठा सुरळीत राहील. फलटण शहरातील नागरिकांनी जर सत्ता आमच्या हातात दिली तर येत्या दोन वर्षात संपूर्ण शहरातील रस्त्यांचे दर्जेदार काँक्रिटीकरण करणार आहे तसेच टप्प्याटप्प्याने संकलित कर सुद्धा कमी करून एक फलटण स्वच्छ व सुंदर शहर बनवणार आहे. शहरासाठी अनेक उद्याने उभी करणार आहे अशी ग्वाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
No comments