Breaking News

प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद

Police arrested two people who robbed passengers

    सातारा दि १४ ( प्रतिनिधी )प्रवाशांना लुटणाऱ्या दोन जणांना बारा तासांच्या आत जेरबंद करण्यात सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला यश आले. शाहिद शफिक शेख (रा. रुपीनगर, निगडी, पुणे), विनायक गोवर्धन घाडगे (रा. नागरदेवळे, अहमदनगर) अशी संशयितांची नावे आहेत.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा तालुका पोलीस ठाण्यात दि. ११ रोजी सुनील कुमार विश्वनाथ गर्जे (रा. कल्याण पूर्व) यांनी सातारा शहराच्या जवळील विठ्ठल मंगलम हॉटेल समोरील रस्त्यावर दोन जणांनी रोख रक्कम व मोबाईल फोन चोरून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, सातारचे पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी नीलेश तांबे यांना संबंधित आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नीलेश तांबे, सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. नेवसे, एस. एस. काटकर, सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे व सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने या आरोपींची गोपनीय माहिती मिळवली.

    पोलिसांनी दोन संशयितांना किणी वाठार (कोल्हापूर) येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तक्रारदारांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरून नेल्याची कबुली दिली. दरम्यान, संबंधितांकडून रोख रक्कम व मोबाईल फोन ताब्यात घेऊन दोन्ही संशयितांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. नेवसे करीत आहेत.

    या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. नेवसे, अनिल मोरडे, एस. एस. काटकर, पोलीस हवालदार राजू शिखरे, मालोजी चव्हाण, दादा स्वामी, पोलीस नाईक प्रदीप मोहिते, सतीश बाबर, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी डफळे, संदीप पांडव, धीरज पारडे, सचिन झनकर, रोहित बाबर, चालक सहायक फौजदार माने यांनी सहभाग घेतला.

No comments