परभणी घटनेच्या निषेधार्थ फलटण येथे निषेध मोर्चा ; आरोपींवर कठोर कारवाई करावी व संबंधीत पोलीसांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.18 - परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाची विटंबना झाल्याबाबत व भीमसैनिक सोमनाथ भाऊ सुर्यवंशी यांच्या हत्येस कारणीभुत असणाऱ्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी व संबंधीत पोलीसांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा व सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालविण्यात येऊन योग्य न्याय मिळावा अशी मागणी निषेधमोर्चाद्वारे संविधान समर्थन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
संविधान विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस लॉकअप मध्ये झालेला मृत्यू या प्रकरणाच्या निषेधार्थ, संविधान समर्थन समितीच्या वतीने मंगळवार पेठ येथून निषेध मोर्चा काढून प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन उपरोक्त मागणी करण्यात आली.
संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथेफिरु इसमाने विटंबना केली असुन, त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने झाली. आंदोलन झाल्यानंतर त्याठिकाणी कोंबींग ऑपरेशन पोलीस विभागाकडून करण्यात आले. त्यावेळी आमच्या वडार समाजाचा पँथर सोमनाथ भाऊ सुर्यवंशी यांना अटक करून नेले, त्यानंतर त्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला, यास जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकारी यांचा संविधानीक मार्गाने सर्व संविधान प्रेमींच्या वतीने निषेध करण्यात आला असुन, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी व संबंधीत पोलीसांवर ३०२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा व सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालविण्यात येऊन योग्य न्याय मिळावा.
No comments