परभणी येथील घटनेचा रिपाई तर्फे जाहीर निषेध
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.18 - परभणी येथील घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) फलटण तालुका व शहराच्या वतीने जाहीर निषेध करून, याप्रकरणी शासनाने योग्य ती दखल घेवून, आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी व शहीद सोमनाथ सुर्यवंशी याच्या कुटूंबियास न्याय द्यावा अशी मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) फलटण तालुका व शहराच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, परभणी येथे जातीयवादी व मनुवादी गावगुंडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील संविधानाच्या प्रतिकृतींची (प्रतिमा) व्देष भावनेतून व जातीयवादी भावनेतून मोडतोड करुन पायदळी तुडविल्याने साहजिकच तेथील भिमसैनिकांचा संताप अनावर होवून त्याठिकाणी एकत्र जमले असताना काही वेळातच परिस्थिती येथील हाताबाहेर गेली असताना परभणी येथील पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन लावून तेथील भिमसैनिकांवर तुफान लाठीचार्ज करून अनेकांना जखमी केले आहे. घरांमध्ये घुसून मारहाण करुन अनेक भिमसैनिकांना धरपकड करुन जेलमध्ये टाकले आहे.
या पोलिसांच्या मारहानीत परभणी येथील भिमसैनिक शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडी (जेल) मध्ये पोलिसांच्या अत्याचारामुळे जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचा नाहक व विनाकारण पोलिसांनी बळी घेतला आहे. त्यामुळे प्रथम दर्शनी असे दिसून येत आहे की, पोलिसांनी बळाचा वापर करुन दलित तरुणाचा खून केला आहे. त्यामुळे परभणी येथील पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी व शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांचे पुर्नवसन करुन आर्थिक सहाय्य मिळावे, त्याचप्रमाणे आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करुन गुन्हे मागे घ्यावेत. तसेच जातीयवादी व मनुवादी गावगुंडांवर गुन्हे दाखल व्हावेत व परभणी येथील या घटनेस जबाबदार असणाऱ्या जातीयवादी व मनुवादी पोलिस निरीक्षक श्री. अशाके घोरदंड यास दोषी मानून बडतर्फ करण्यात यावे. इ. मागण्यांचे निवेदन आज दिनांक १७/१२/२०२४ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) फलटण तालुका व शहराच्या वतीने देणेत येत असून याप्रकरणी शासनाने योग्य ती दखल घेवून सविस्तर कायदेशीर कारवाई करावी व शहीद सोमनाथ सुर्यवंशी याच्या कुटूंबियास न्याय मिळावा.
No comments