फलटण शहरासाठी वीज उपकेंद्र व वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामासा मंजूरी मिळण्यामागे श्रीमंत रामराजे यांचे प्रयत्न - दिपक चव्हाण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 14 - फलटण शहराकरीता नविन ३३/११ के. व्ही. उपकेंद्र उभारणे व सर्व वीज वाहिन्या भूमिगत करणे यांच्या मंजूरी बाबात श्रीमंत रामराजे यांनी प्रयत्न केले असल्यानेच शहरात उपकेंद्र उभारणे व सर्व वीज वाहिन्या भूमिगत करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असून विरोधकांनी मंजुर कामांचे श्रेय घेऊ नये सदरच्या कामाबाबतचा पाठपुरावा व झालेला पत्रव्यवहार आमच्याकडे उपलब्ध असून असे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सद्यस्थितीमध्ये फलटण शहरामध्ये अंदाजित घरगुती २७२९८ ग्राहक, व्यावसायिक ४०७० ग्राहक, औद्योगिक ४०७ ग्राहक व इतर ५५४ ग्राहक असे एकूण ३२३२९ ग्राहक आहेत. फलटण शहराला १३२ के.व्ही. कोळकी उपकेंद्रातून तीन (३) उच्चदाब वाहिन्यांद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो. सदर उच्चदाब वाहिन्यांची लांबी जास्त असल्याने योग्य दाबाने वीज पुरवठा होण्यास अडचण निर्माण होत असल्याने वीज ग्राहकांना त्रासास सामोरे जावे लागत असून, औद्योगिक क्षेत्रास देखील असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सर्व वाहिन्या उघडया असल्याने विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने तसेच उच्चदाब वीज वाहिन्या उघड्या असल्याने भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने, फलटण शहरामधील वीज ग्राहकांना अखंडीत व योग्य दाबाने वीज पुरवठा करण्याकरीता फलटण शहराकरीता नविन ३३/११ के. व्ही. उपकेंद्र उभारणे आवश्यक असून सर्व वीज वाहिन्या भूमिगत करणे अत्यंत आवश्यक असल्याने, श्रीमंत रामराजे यांनी दिनांक ३/८/२०२३ रोजी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्याच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करून सदरच्या कामाबाबत ५/९/२०२३ रोजी संतोष सागळे विशेष कार्यकारी अधिकारी ऊर्जा विभाग यांच्या मार्फत सदरचा प्रस्ताव व्यवस्थापकीय संचालक महावितरण मुंबई यांच्याकडे वर्ग केला. १४/९/२०२३ रोजी हा प्रस्ताव बारामती महावितरण परिमंडळ कार्यालयाकडे पाठविण्यात आला याबाबत पत्रव्यवहार आमच्याकडे उपलब्ध आहे.
आर.डी.एस.एस योजनेअंतर्गत डी.पी.आर मध्ये सदरचे कामाचा समावेश करण्याचे आदेश मुख्य अभियंता यांच्याकडून दिले गेले. या कामाच्या बाबत आवश्यक सर्व पत्र व्यवहार आमच्याकडे उपलब्ध असताना शहरात उपकेंद्र उभारणे व सर्व वीज वाहिन्या भूमिगत मिळालेल्या मंजुरीमागे आमचे योगदान असल्याचा विरोधकांचा प्रयत्न हास्यास्पद आहे. श्रीमंत रामराजे यांनी एक वर्ष प्रयत्न व पाठपुरावा करून मंजूर करून आणलेल्या कामा बाबत माहिती घेऊन तेच काम पत्रात नमूद करून शेरा घेऊन अशी कामे आम्हीच मंजुर केली आहे असे दाखण्याचा प्रयत्न तालुक्यात विरोधकांकडून सुरू आहे शेरा घेऊन विकासाची कामे होत नाहीत दूरदृष्टी व सतत पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून विकासाची कामे होतात दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊन कामे होत नाहीत असा टोला माजी आमदार दीपक चव्हाण यांनी लगावला आहे.
No comments