Breaking News

फलटण बाजार समितीमध्ये सोयाबीन हमी भाव खरेदी सुरू : नाफेडमार्फत ४३० क्विंटल खरेदी

Soybean guaranteed price purchase started in Phaltan Market Committee: Purchase of 430 quintals through NAFED

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 7 -  कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या मुख्य बाजार आवारात नाफेड व तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले असून या केंद्रावर शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ रुपये दराने आजपर्यंत ४३० क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे.

    नाफेड मार्फत हंगाम २०२४-२५ मध्ये सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरू असून दि. १५ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ऑनलाइन नोंदणी केली नाही, त्यांनी मुदतीत नावनोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे.

    बाजारामध्ये सोयाबीन शेतमालाचे भाव पडल्याने फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले असून याकरिता सबएजंट म्हणून फलटण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची निवड करण्यात आली आहे. सोयाबीन या शेतमालाचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये प्रति किंटल असून, कमाल आर्द्रता १२ टक्के व माल चांगल्या (FAQ) दर्जाचा असावा असे सुचविण्यात आले आहे. २०२४-२५ च्या हंगामात ७/१२ वर सोयाबीन पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. सरासरी उत्पादकता विचारात घेता प्रति हेक्टरी २६ किंटल सोयाबीन खरेदी केली जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे शेतमाल आणण्याची तारीख कळविण्यात येत आहे, त्याचदिवशी खरेदी केंद्रावर माल आणावा, असे आवाहन समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले. हमीभाव खरेदीबाबत अधिक माहितीसाठी फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक विठ्ठल जाधव यांच्याशी ७९७२४१७५४६ व समितीचे कनिष्ठ लिपिक स्वप्नील देशमुख यांच्याशी मोबा. ९८६०५७३७२७ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments