आदर्की बुद्रुक ग्रामपंचायतीला उपलब्ध झालेली ई घंटागाडी गावासाठी आरोग्यदायक ठरणार - बाळासाहेब कासार (मोहोळकर)
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३० : दैनंदिन जीवनात आपले घर, परिसर व गाव स्वच्छ ठेवल्यास गावात आजाराला शिरकाव मिळणार नाही, सर्वांचे आरोग्य सुदृढ व तंदुरुस्त राहिल याची ग्वाही देत स्वच्छ भारत योजना व घनकचरा व्यवस्थापनांतर्गत आदर्की बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी शासनाने उपलब्ध केलेली तीन चाकी ई घंटागाडी गावासाठी आरोग्यदायक ठरणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन श्री भैरवनाथ संस्था समूहाचे प्रमुख बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांनी केले आहे.
स्वच्छ भारत योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाने सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून तीन चाकी इलेक्ट्रीक घंटागाडी आदर्की बुद्रुक ता. फलटण ग्रामपंचायतीला प्राप्त झाली असून त्याचा लोकार्पण सोहोळा सरपंच गणपतराव धुमाळ व महा डिजिटल मिडिया असोसिएन प्रदेशाध्यक्ष विनायक शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून समारंभपूर्वक संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमास श्री भैरवनाथ मल्टीस्टेटचे व्हा. चेअरमन संजय पवार, संचालक हणमंतराव पवार, माजी सैनिक पोपटराव धुमाळ, दिलीप धुमाळ, हणमंतराव मदने, मोहनराव मोहोळकर, बाळासाहेब शेडगे, सिकंदर आतार, विजयकुमार जाधव, सोमनाथ जाधव, काकडे, तुषार पवार, पाणी पुरवठा कर्मचारी जावेद पठाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
३ चाकी ई घंटागाडीमुळे गावातील ओला व सुका कचरा दररोज उचलला जाणार आहे. त्यामुळे गावात प्रदुषण होणार नाही याची काळजी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ घेतील. तीन चाकी घंटागाडी इलेक्ट्रीक असल्याने इंधन बचत व मेन्टेनन्स यासारख्या गोष्टींचा विचार करुन गावाला आधुनिक जगाशी जोडणारा एक धाडसी निर्णय घेतल्याने आदर्की बुद्रुक ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे अनेकांनी कौतुक केले आहे.
No comments