आज फलटणच्या श्रीराम रथोत्सवाचा मुख्य दिवस
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ - फलटणचा ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे. आज मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा सोमवार, दि. २ डिसेंबर यात्रेचा मुख्य दिवस आहे. आज सकाळी ८ वाजता श्रीरामाचा रथ नगर प्रदक्षिणेसाठी निघणार असून, परंपरागत मार्गाने नगर प्रदक्षिणा पूर्ण करून सायंकाळी श्रीराम मंदिरात पोहोचणार आहे. रथोत्सवाच्या आदल्या दिवशी दि.१ रोजी प्रभू श्रीरामाच्या रथाला मान्यवरांच्या शुभहस्ते लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी राजकारण्यातील श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि.२७ पासून श्रीराम मंदिरात दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत प्रभावळ, अंबारी, शेष, गरुड आणि मारुती या ५ वाहनांद्वारे परंपरागत पद्धतीने मिरवणूक येत असून प्रतिवर्षी ही वाहने, मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. आज दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्रीराम मंदिरात कीर्तन झाल्यानंतर प्रभू रामचंद्राची मूर्ती रथामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रथ सोहळा रथ मार्गावरून मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून सायंकाळी ७ वाजता रथ सोहळा श्रीराम मंदिरात परत येईल. त्यानंतर दि. ६ रोजी श्रींची पाकाळणी, सकाळी काकड आरती आणि नंतर ११ ब्राह्मणांकडून लघुरुद्र व महापूजा झाल्यावर यात्रेची सांगता होणार आहे. नाईक निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी सुमारे २६१ वर्षांपूर्वी रथयात्रेची ही प्रथा सुरू केली असून आजही ती सुरू आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्री रामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते.
या श्रीराम रथउत्सवा दरम्यान शहरामध्ये मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. या यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने आलेली आहेत. शहरात यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदान, घडसोली मैदानाच्या समोर मोठे पाळणे व इतर खेळणी आलेली विविध ग्रुप वस्तूंचा छोटी मोठी दुकाने महावीर स्तंभ ते गजानन चौक यादरम्यान लावण्यात आलेली आहेत.
No comments