भारत देशाची आजची प्रगती केवळ संविधानामुळेच –प्रो. डॉ. प्रभाकर पवार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ८ - ब्रिटिश साम्राज्यवादाच्या जोखाड्यातून भारत देश मुक्त झाल्यानंतर स्वतंत्र भारताच्या संविधानाने देशाला मजबूत अशी जीवनपद्धती, कायदेपद्धती व विकास पद्धती दिल्यामुळेच आज भारत देशात जी काही प्रगती दिसत आहे, ती केवळ भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीमुळेच आहे,असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.प्रभाकर पवार यांनी केले.
मुधोजी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष,राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ.पंढरीनाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या 'संविधान दिन' गौरव पर कार्यक्रमात प्रो. डॉ.प्रभाकर पवार प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. अनिल टिके होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.डॉ. अशोक शिंदे,प्रा.अक्षय अहिवळे व प्रा.सौ. प्रियांका शिंदे इत्यादी होते.
प्रो. डॉ.प्रभाकर पवार पुढे म्हणाले,भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय लिखित संविधान असून त्याला जगभरातील ज्ञानशाखा,विद्यापीठे व घटना तज्ञांनी गौरवलेले आहे. २६ नोव्हेंबर १९५० रोजी ते मंजूर होऊन, त्या ठरावावर संविधान सभेच्या २८४ सदस्यांच्या सह्या आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत.अनेक धर्म, जाती,पोटजाती,वंश,पंत, संप्रदाय असणाऱ्या भारत देशाच्या समाज व्यवस्थेला एका रेशमी धाग्यात बांधून विकासाचा मार्ग दाखवण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून पूर्ण केले.त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.हावर्ड विद्यापीठाने तर त्यांचा मानव मुक्तीचा संघर्षशाली सर्वोच्च योद्धा असा गौरव केलेला आहे. आपली सारी ज्ञानकेंद्रे,बुद्धिमत्ता व विचारप्रणाली पणास लावून भारतीय संस्कृतीला उज्वल परंपरा प्राप्त करून देण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे प्रकांड पंडित करू शकले,हे भारतीयांसाठी अप्रूप गोष्ट आहे.प्रत्येक भारतीयांनी एक जबाबदार नागरिक म्हणून भारतीय राज्यघटने सारख्या पवित्र दस्तऐवजाचे प्राणापलीकडे संरक्षण करून त्याची भूज राखली पाहिजे व भारत देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले पाहिजे असे प्रो. डॉ. प्रभाकर पवार यांनी आवर्जून सांगितले.
स्वातंत्र्य,समता,बंधुता सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता यांची हमी देणारे संविधान सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय,आचार विचार,धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य देते,राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन संविधानामध्ये आहे, संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्षता,लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करते व नागरिकांना न्याय,समानता आणि स्वातंत्र्य,बंधुत्वाला चालना देण्यासाठी भारतीय संविधान संवैधानिक वर्चस्व प्रदान करते ते संसदीय वर्चस्व प्रदान करत नाही कारण ते लोकाद्वारे प्रस्तावित घोषणेसह स्वीकारल्यामुळे संसद राज्यघटनेला कधीही डावलू शकत नाही, अशी ही संविधानाची व्यापकता प्रत्येकाने अभ्यासाने माहीत करून घेतली पाहिजे तरच आपणाला देशाची प्रगती करता येईल.मानवी मूल्य आणि मानवी गरजा व त्यावरील उपाय योजना याचे इथंभूत त्वज्ञान भारतीय संविधानात सामावलेले दिसून येते. म्हणून प्रत्येक भारतीयांनी हा पवित्र ग्रंथ जपून त्याची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तरच खऱ्या अर्थाने संविधानाला अपेक्षित असलेला भारत देश उभा राहून जागतिक स्तरावर तिची विकासात्मक अशा प्रकारची दृष्टी जगाला माहीत होईल असेही प्रो. डॉ.प्रभाकर पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संयोजन प्रा.अक्षय अहिवळे यांनी केले. संविधानाच्या उद्दिष्ट पत्रिकेचे सार्वजनिक वाचन एन.एस.एस कार्यक्रमाधिकारी एड. प्रा.डॉ.अशोक शिंदे यांनी केले.कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांत मोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रमोद पिचड यांनी मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
No comments