Breaking News

नॅक मधील उत्कृष्ट मूल्यांकनाबद्दल कुलगुरू डॉ.डी टी.शिर्के यांची मुधोजी महाविद्यालयास भेट

Vice-Chancellor Dr.D.T.Shirke's visit to Mudhoji College for excellent assessment in NAAC

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो डॉ. डी.टी शिर्के यांनी मधोजी महाविद्यालयास नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

    त्यांनी प्राध्यापकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या काही विद्यापीठाशी संबंधित समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी प्राध्यापकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयक काही मुद्द्यांची चर्चा केली, तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षकेतर कर्मचारी भरती बाबत विद्यापीठाने पाठपुरावा करावा असे सुचविले. शिक्षक वृंदांनी विचारलेले प्रश्नांच्या अनुषंगाने कुलगुरू महोदयांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व शंका कुशंका दूर करून तात्काळ प्राचार्यांच्या मार्फत आपल्या काही सूचना विद्यापीठाकडे पाठवून द्याव्यात असे सूचित केले. ते पुढे बोलत असताना म्हणाले की मुधोजी महाविद्यालयाने नेक ची ए प्लस श्रेणी मिळवली त्याबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन करण्याच्या हेतूनेच आजची ही माझी महाविद्यालयास सदिच्छा भेट आहे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले व ही चांगली श्रेणी प्राप्त केली आपण निश्चितच कौतुकास पात्र आहात यापुढे आपण अन्य महाविद्यालयांनाही मार्गदर्शन करावे असे संबोधित केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अभ्यास मंडळाच्या माध्यमातून उपयोजित अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने बदल घडवून आणावेत असे आवाहन केले. त्याबरोबरच त्यांनी मुधोजी महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग, कलाविष्कार विभागाच्या दैदीप्यमान कामगिरीबद्दल कौतुक केले. 

    कुलगुरू प्रो डॉ. डी.टी शिर्के यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना, विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करताना असे प्रतिपादन केले की, विद्यार्थ्यांनी विविध व्यवसायिक कोर्सेसच्या माध्यमातून करियर करत असताना, प्रेझेंटेशनला जास्त महत्त्व द्यावे कारण आपण जे ज्ञान अगर कौशल्य प्राप्त केलेले असते त्याबाबतची माहिती आपण प्रेझेंट करण्यासाठी चांगल्या संवाद कौशल्याची आवश्यकता असते. त्यावर आपण भर द्यावा, त्यासाठी ग्रुप डिस्कशन ओरल एक्झाम या अतिशय महत्त्वाच्या  असतात परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी त्याबाबतीतच पुणे मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेने मागे पडतात म्हणून आपण मुलाखतीची तयारी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रारंभी एनसीसीच्या कॅडेटने कुलगुरूंचे सलामी देऊन स्वागत केले त्यावेळी त्यांच्यासोबत व्यवस्थापनाच्या वतीने फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे, ट्रेझरर हेमंत रानडे गव्हर्निंग कौन्सिलचे मेंबर डॉक्टर राजवैद्य व प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर उपस्थित होते. व्यवस्थापनाच्या वतीने शिर्के साहेबांचे स्वागत श्रीमंत संजीवराजे यांनी केले. प्राचार्य डॉ पी.एच कदम यांनी कुलगुरूंना प्राचार्य विश्वासराव देशमुख लिखित मालोजीराजे हा ग्रंथ भेट देऊन स्वागत केले व आपल्या प्रस्ताविकामध्ये महाविद्यालयाची माहिती दिली. महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या महाविद्यालयाने मिळवलेले पुरस्कार व गत पाच वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीचा आलेख त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये मांडला. तर अंतिमता महाविद्यालय गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.टी.पी शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.

    या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एकूण 150 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केलेल्या कौतुकामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीला आणखी गती प्राप्त होणार आहे.

    त्यामुळे ही भेट महाविद्यालयाच्या व फलटण एज्युकेशन सोसायटीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कुलगुरू महोदयांनी आपल्या व्यस्त कामकाजातून कोल्हापूर पासून 200 किलोमीटरवर लांब असणाऱ्या मुधोजी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्रशासन व फलटण एज्युकेशन सोसायटी यांनी शिर्के साहेबांचे ऋण व्यक्त केले.

No comments