Breaking News

पुरस्काराने जगण्याचे बळ मिळते - प्राचार्य शांताराम आवटे

Award gives strength to live - Principal Shantaram Awte

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३१ - संवाद माणसाला अधिक जवळ आणतो,या जवळीकतेतून माणसांचे जीवन अधिक समृद्ध होते. त्यामुळे माणसांनी मोबाईलवरून संदेश पाठवण्यापेक्षा फोन करुन बोललेले चांगले किंवा प्रत्यक्ष भेटून बोललेले बरे.साहित्यिकांनी आपला संवाद इतरांशी सतत ठेवला पाहिजे. त्यामुळे साहित्य अधिक समृद्ध होते व साहित्यिक एकमेकांशी जोडले जातात. अलीकडे  पुरस्कार विकणाऱ्या काही संस्था टोळ्या अस्तित्वात आलेल्या आहेत या संस्थामुळे पुरस्कारांचे अवमूल्यन झाले आहे. असे पुरस्कार घेणे योग्य नव्हे. योग्य माणसाला योग्य पुरस्कार मिळाला तर माणसाची व पुरस्काराची उंची वाढते अशा पुरस्कारामुळे जगण्याचे बळ मिळते असे असे प्रतिपादन प्राचार्य शांताराम आवटे यांनी केले.

    नाना नानी पार्क फलटण येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वनविभाग फलटण यांच्या संयुक्त आयोजित तेवीसाव्या साहित्यिक संवाद या कार्यक्रमात मसापचे माजी अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे हे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, संयोजक व  माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, रानकवी राहुल निकम, ॲड. श्रेयश कांबळे, श्रीनिवास लोंढे  यांची प्रमुख उपस्थिती होती.

    शांताराम आवटे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण यांचा सर्जाकार सुरेश शिंदे यांना यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार मिळाला आहे.  तसेच माणदेशी साहित्यिक  ताराचंद्र आवळे यांना माजी विद्यार्थी संघटना बंडो गोपाळ मुकादम शैक्षणिक संकुल कुसूर तालुका कराड यांचा प्राचार्य ए. डी. अत्तार आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ही साहित्यिक संवाद कार्यक्रमासाठी प्रेरणादायी व गौरवास्पद बाब आहे. साहित्यिक संवाद यामधील साहित्यिकांना मिळणारे पुरस्कार हे निश्चितच ऊर्जा देणारे आहेत. साहित्यिकांच्या हातून नवनव्या साहित्यकृती निर्माण झाल्या पाहिजेत व त्या योग्य वाचकाच्या हाती पडल्या पाहिजेत. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे  म्हणाले की तरुण पिढीने अधिक वाचन करून समृद्ध झाले पाहिजे व योग्य पद्धतीने लिखाण करून समाजापुढे आणले पाहिजे असे लिखाण निश्चितच तरुणाईला दिशा देईल. 
ॲड.श्रेयस कांबळे म्हणाले की कोणतेही काम जाहिरातीसाठी किंवा प्रसिद्धीसाठी न करता मिशन म्हणून काम केले पाहिजे, त्यामुळे दर्जेदार काम उभे राहते, अशी माणसे दुर्लक्षित राहिली तरीपण ती समाजासाठी  दीपस्तंभासारखी असतात.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी करून साहित्यिक संवादाचे महत्त्व विशद केले व भविष्यातील साहित्यिक कार्यक्रमांची माहिती दिली.

    ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना पदमश्री पुरस्कार जाहीर झाला, सर्जाकार सुरेश शिंदे यांना यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार मिळाला तसेच माणदेशी साहित्यिक व प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे यांना प्राचार्य ए. डी. अत्तार आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेबद्दल रानकवी राहुल निकम यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला, त्यास सर्वांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे आभार श्रीनिवास लोंढे यांनी मानले. यावेळी फलटण साहित्यिक व साहित्य प्रेमी उपस्थित होते.

No comments