नैसर्गिक आपत्ती, नुकसान भरपाई व अन्य योजनांच्या लाभासाठी पीक पाहणी आवश्यक : प्रांताधिकारी सचिन ढोले
फलटण दि. १६ : नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, पीक विषयक शासकीय योजनांची अनुदाने व अन्य शासकीय लाभ घेण्यासाठी पीक पाहणी नोंद ही आवश्यक बाब असून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील उभ्या पिकाची नोंद स्वतःहुन करणे अपेक्षीत असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
महाराष्ट्रभर रब्बी हंगाम पीक पाहणी व नोंदणी मोहिम सध्या सुरु असून शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे स्वतः आपल्या पिकांची नोंद करावी यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी तालुक्यातील जिंती परिसर व तरडगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आवाहन करताना त्यांना ॲपद्वारे पीक पाहणी नोंदणीचे प्रात्यक्षिकासह माहिती दिली, जिंती, ता. फलटण येथे सागर गरुड यांच्या शेतावर महसूल मंडलाधिकारी विनायक गाडे, ग्राम महसूल अधिकारी दिपक नलगे, सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी योगेश वाघमारे यंच्यासमवेत भेट दिली आणि त्यांच्या क्षेत्रातील ऊस, गहू व फळबागांच्या नोंदी सदर शेतकऱ्यांकडून करवून घेतल्या, त्यावेळी प्रांताधिकारी बोलत होते.
शेतकऱ्यांनी स्वतः हुन आपल्या रब्बी क्षेत्राची पीक पाहणी नोंद मोबाईल ॲप द्वारे करण्याची मुदत बुधवार दि. १५ जानेवारी पर्यंत होती, त्यानंतर आता ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी (कोतवाल), पोलिस पाटील यांच्या मार्फत उर्वरित रब्बी पीक पाहणी नोंदणी करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे.
सातारा जिल्ह्यात पेरणी लायक एकूण प्लॉटची संख्या ४० लाख ६७ हजार ७०७ असून त्यापैकी १ लाख ९ हजार ४९२ म्हणजे केवळ २.६९ टक्के प्लॉट वरील पीक पाहणी नोंद झाली आहे, तथापि रब्बीचे एकूण क्षेत्र कमी असून या क्षेत्रापैकी सुमारे २० टक्के क्षेत्रावरील पीक पाहणी नोंद झाल्याचे दिसून येते.
फलटण तालुक्यात २ लाख ४५ हजार ८४९ प्लॉट असून त्यापैकी ११ हजार ३६१ म्हणजे ४.६२ टक्के प्लॉट वरील पिकांची नोंदणी झाली आहे, तथापि फलटण तालुक्यात ४१ हजार ८९ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असून त्यापैकी सुमारे २०/२२ टक्के क्षेत्रावरील पीक पाहणी नोंद शेतकऱ्यांनी ॲप द्वारे केली असून उर्वरित क्षेत्रावरील पीक पाहणी नोंद दि. १६ जानेवारी पासून ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी, पोलिस पाटील यांच्या मार्फत करण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे केलेल्या नोंदी मध्ये त्यांना समाधान लाभत असल्याने यापुढे शेतकऱ्यांनी स्वतः हुन पीक पाहणी करावी असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे.
No comments