शेतकरी महिलां भगिनींच्यl पाठीशी कायम उभे राहू - मंत्री शिवेंद्रसिंहराजे, मकरंद पाटील यांचे जिल्हा बँकेला आश्वासन
सातारा दि ४ (प्रतिनिधी ) जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहकार क्षेत्राचा इतिहास आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेली ही बँक शेतकरी, कष्टकरी, महिला यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने काम करत आली आहे. आता मंत्रिमंडळात आम्हाला स्थान मिळाले असल्याने जिल्हा बँकेचे शासन पातळीवर असलेले प्रश्न मार्गी लावू. शेतकरी, कष्टकरी, महिला भगिनी यांच्या पाठीशी कायम उभे राहू, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, व कर्मचार्यांच्यावतीने ना. शिवेंद्रराजे व ना. मकरंद आबा यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी या दोघांनीही या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी विधानपरिषदेचे माजी सभापती व बँकेचे ज्येष्ठ संचालक आ. रामराजे नाईक निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाईल, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आ. प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, सत्यजित पाटणकर, राजेंद्र राजपुरे, सुनील खत्री, रामभाऊ लेंभे, सुरेश सावंत, लहूराज जाधव, ऋतुजा पाटील, कांचन साळुंखे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांची उपस्थिती होती.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी रामराजे, भाऊसाहेब महाराज, लक्ष्मणराव पाटील, विलासकाका उंडाळकर यांनी मोठे योगदान दिले आहे, त्यांचाच वारसा आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत. गेली अनेक वर्षे आम्ही सर्वजण एकत्र जिल्हा बँकेत काम करतो. या बँकेत आम्ही कधीही राजकारण आणले नाही. मला आणि मकरंदआबांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले असले तरी आम्ही पदाच्या माध्यमातून बँकेचे आणि जिल्ह्यातील शेतकर्यांचे शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रश्नांमध्ये लक्ष घालू. जिल्हा बँकेची वाटचाल अशीच प्रगतीपथावर कशी राहिली, असा प्रयत्न राज्याचा मंत्रिपद म्हणून राहील.
ना. मकरंद पाटील म्हणाले, मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा बँकेने संचालक, अधिकारी, कर्मचार्यांच्यावतीने शिवेंद्रबाबा आणि माझा सत्कार आयोजित केला. अतिशय वेगळ्या भावनेने हा सत्कार केला. तात्या बँकेचे चेअरमन होते. खा. नितीन पाटील चेअरमन आहेत. रामराजे, बाळासाहेब पाटील, शिवेंद्रराजे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी ही बँक सर्वसामान्य शेतकर्यांच्या, कष्टकर्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करते, त्यामुळे हा सत्कार आगळावेगळा आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जिल्हा बँकेला इतिहास आहे. चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची स्थापना झाली. स्वातंत्र्यवीर आबासाहेब वीर, माजी मंत्री विलासराव पाटील, भाऊसाहेब महाराज यांनी बँकेचा कारभार अतिशय स्वच्छ आणि पारदर्शकपणे केला. आम्ही देखील कोणताही राजकीय हेतू न ठेवता कष्टकर्यांचे, महिला भगिनींचे हित डोळ्यांसमोर ठेवून काम करत आहोत. राज्याच्या स्तरावरील जिल्हा बँकेचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न करु. ज्या विश्वास आणि आनंदाने हा सत्कार केला, त्याला प्रामाणिक राहूनच काम करु.
खा. नितीन पाटील म्हणाले, जिल्हा बँकेचे संचालक ना. शिवेंद्रराजे भोसले आणि ना. मकरंद पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले असल्याने जिल्ह्यात मोठा उत्साह आहे. सर्व लोकांनी मोठ्या आनंद आणि उत्साहात त्यांचा सत्कार केला.
दरम्यान, सुरुवातीला ना. शिवेंद्रराजे भोसले आणि ना. मकरंद पाटील यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांना तसेच पुण्यतिथीचे औचित्य साधून विलासकाका पाटील उंडाळकर यांना अभिवादन केले.
No comments