Breaking News

आळजापूर येथे आडवी बाटली ; दारु दुकान बंद करण्यासाठी ६६ टक्के महिलांचे मतदान

Horizontal bottle at Aljapur;  66 percent of women voted to close liquor shops

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.12 - आळजापूर, ता. फलटण येथे शासन मान्यतेने सुरु करण्यात आलेले हॉटेल दुर्वांकुर बिअर बार परमिट रुम बंद करण्यासाठी महसूल प्रशासनाच्या माध्यमातून आज गावात महिलांचे मतदान घेण्यात आले असता एकूण ७२३ पैकी ४५४ म्हणजे ६६.३९ टक्के महिलांनी सदर परमिट रुम बिअर बार बंद करण्याच्या बाजूने मतदान केले आहे.

    आळजापूर ता. फलटण येथे ६ महिन्यापूर्वी सुरु झालेल्या परमिट रुम बिअर बार या दारु दुकानाला विरोध करीत महिला व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांनी गावात सुरु केलेला लढा अंतीम टप्प्यात यशस्वी झाला असून आज शनिवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत ग्रामपंचायत कार्यालय आळजापुर येथे महसूल प्रशासनाने पूर्व कल्पना देवून गावातील सर्व ७२३ महिलांना मतदान करण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिली होती. त्यामध्ये ७२३ पैकी ४८० म्हणजे ६६.३९ टक्के महिलांनी मतदान केले, त्यापैकी ४५४ म्हणजे ६२.६९ टक्के महिलांनी सदर दुकान बंद करण्याच्या मागणीला पाठिंबा देत आडव्या बाटलीला मतदान केले, तर १९ म्हणजे २.६२ टक्के महिलांनी सदर दुकान सुरु ठेवण्याच्या मागणीला पाठिंबा देत उभ्या बाटलीला मतदान केले. ७ महिलांचे मतदान अवैध ठरले.

    कोणतीही परवानगी अथवा ना हरकत दाखला न घेता उत्पादन शुल्क विभागाने या दारु दुकानाला परवानगी दिली असून गावात याची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच शुभम नलवडे यांनी या विषयावर तातडीने बैठक बोलावली होती. गावातील सर्वच महिला व ग्रामस्थ यांनी आपल्या गावात दारुचे दुकान नको अशी भूमिका घेतली होती.

    विलासराव नलवडे, नितीन नलवडे, सरपंच शुभम नलवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील महिला व ग्रामस्थ यांची मागणी विचारात घेऊन जिल्हाधिकारी सातारा यांना गावातील महिलांचे सह्यांचे निवेदन देवून सदर दुकान बंद करण्याची मागणी केली होती.

    यावर उत्पादन शुल्क विभागाने  निवेदनावरील महिलांच्या सह्यांची पडताळणी करुन अहवाल सादर केला असता २५ % पेक्षा अधिक महिला मतदारांची मागणी असल्याने जिल्हाधिकारी यांनी शनिवार दि. ११ जानेवारी रोजी या गावात मतदानाची तारीख निश्चित केली होती, त्यानुसार आज तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार तथा निवडणूक पर्यवेक्षण अधिकारी अभिजित सोनवणे, महसूल मंडलाधिकारी योगेश धेंडे व विनायक गाडे, ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, उत्पादन शुल्क विभाग निरीक्षक माधव चव्हाण यांनी सदर मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडेल यासाठी योग्य नियोजन केले होते, त्यांना लोणंद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, पोलिसउपनिरीक्षक कदम व त्यांचे सहकारी, ग्राम महसूल अधिकारी आळजापूर अश्विनी क्षीरसागर, अन्य ठिकाणचे ग्राम महसूल अधिकारी सर्वश्री सचिन क्षीरसागर, संतोष पुंडेकर, आकाश ढोमसे, मनोहर सगभोर, विनोद चव्हाण, गौरव परदेशी, अक्षय वाघ, जितेंद्र जाधव यांनी सहकार्य केले.

    व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक गुरुवर्य ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघ प्रणित दारुबंदी चळवळीचे कार्यकर्ते विलासबाबा जवळ, जगन्नाथ शिंदे, महादेव काका, संजय सुतार वगैरेंनी आळजापूर ग्रामस्थांना या आंदोलनात सक्रिय साथ करीत उत्तम मार्गदर्शन केले.

    महिलांचा दारुबंदीचा हा लढा यशस्वी करण्यासाठी गावातील सर्वच युवक मंडळांनी प्रयत्न केले, आणि गावातील वाडी - वस्तीवर पोहचून आडव्या बाटलीचा प्रचार केला. सर्व ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी यांनी दिलेल्या योगदानामुळे व शालेय विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे काढलेल्या जनजागृती रॅलीमुळे आळजापूरचा दारुबंदीचा लढा यशस्वी झाला असून आळजापूर येथील महिलांचा हा निर्धार आणि ग्रामस्थांची एकमुखी साथ दारुबंदीच्या चळवळीला बळकटी देणारी ठरणार आहे.

    नियमानुसार मतदानाचा अहवाल तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव हे जिल्हाधिकारी यांना सादर करणार असून त्यानंतरच याबत पुढील प्रक्रिया स्पष्ट होईल.

No comments