Breaking News

मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार विरोधात ठेकेदार न्यायालयात ; ठेक्याची मुदत संपली नसताना काढली निविदा

In the contractor's court against the arbitrary management of the chief officer; Tender drawn before contract period has expired

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.25 -: फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मनमानी कारभारा विरोधात ठेकदार यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. ठेक्याची मुदत कालावधी संपलेला नसतानाही मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी बेकायदेशीर निविदा काढल्या असून, याप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे व न्यायालयात दाद मागणार असल्याचे सबंधित ठेकेदार यांनी सांगितले आहे.

    याबाबत सबंधित ठेकेदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिटी सर्व्हे नंबर ६४८४ लक्ष्मीनगर बगीचा, लक्ष्मीनगर नाना नानी पार्क बगीचा, महतपुरा पेठ येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उद्यान व सर्व्हे नंबर १११ मधील बगीचा, सिटी सर्व्हे नंबर १९०७ शनीनगर बगीचा याबाबत फलटण नगर परिषद फलटण यांनी प्रशासकीय सभा घेऊन यापूर्वी निविदा मंजूर केल्या होत्या, त्यानुसार संबंधित ठेकेदार यांनी अनामत रक्कम भरुन मुख्याधिकारी यांनी करारनामा करुन दिला होता, त्यानुसार संबंधित ठेकेदार यांना कामाचे आदेश नगरपरिषद, फलटण यांच्याकडून देण्यात आले होते, त्यानुसार वरील बाग बगीचे देखभालीचे काम संबंधित ठेकेदार यांना मिळाले होते, संबंधित ठेकेदार उत्तम प्रकारे देखभाल करत होते, फलटण नगर परिषदे मधील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाने नगर परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी यांची नेमणूक केली होती.

    त्यानंतर मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी यापूर्वी मंजूर झालेल्या निविदेचा कालावधी संपला नसतानाही संबंधित ठेकेदारांचा ठेका तसाच चालू न ठेवता दिनांक २०/०१/२०२५ रोजी वार्षिक निविदा दैनिक पुण्यनगरी व दैनिक गंधवार्ता मध्ये प्रसिद्ध केली असून, यामध्ये वरील उद्यानासाठी एक वर्षाची निविदा प्रसिद्ध करण्याचा आदेश काढला आहे. मुळात सदर उद्यानाच्या देखभालीचा ठेका यापूर्वीच आम्हाला मिळाला असल्याने तसेच त्याचा कालावधी संपला नसतानाही मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी चुकीच्या पद्धतीने हुकूमशाही करत जाहीर निविदा काढण्याचा घाट घातला असल्याचा आरोपी सबंधित ठेकेदार यांनी केला आहे.

    सिटी सर्व्हे नंबर ६४८४ लक्ष्मीनगर बगीचा ठेका मुदत २०२६ अखेर , लक्ष्मीनगर नाना नानी पार्क बगीचा ठेका मुदत ३१/०३/२०२६, महतपुरा पेठ येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उद्यान व सर्व्हे नंबर १११ मधील बगीचा ठेका मुदत ०१/०२/२०२७, सिटी सर्व्हे नंबर १९०७ शनीनगर बगीचा ठेका मुदत ३१/०३/२०२६ असताना चुकीच्या पद्धतीने मनमानी करत आमचे आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने बेकायदेशीररीत्या हा नवीन ठेका काढण्याचा डाव मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी घातला आहे.

    फलटण नगरपरिषद व ठेकेदार यांच्यामध्ये करारनामा झाला असून करारनामाच्या अटीस फलटण नगरपरिषदचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी कायदेशीर दुर्लक्ष केल्याने संबंधित चार ठेकेदार यांनी फलटण दिवाणी न्यायालयात मुख्याधिकारी निखिल मोरे व नगरपरिषद यांचे विरोधात कायदेशीर दाद मागण्याचे ठरवले असून याबाबत कायदेशीर नोटीस मुख्याधिकारी निखिल मोरे यांना बजावली असल्याची माहिती संबंधित ठेकेदार यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे ही दाद मागणार असल्याचे सबंधित ठेकेदार यांनी सांगितले आहे.वरील प्रकरणी बेकायदेशीररीत्या काढलेली वार्षिक निविदा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी तत्काळ मागे घ्यावी असे आवाहन संबंधित ठेकेदारांनी केले आहे व तसे न केल्यास नगर परिषदे समोर आम्हीं आमच्या कुटुंबासमवेत आमरण उपोषणास बसणार असल्याचे संबंधित ठेकेदारांनी सांगितले.

No comments