पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ ; भारतीय लोकशाहीत पत्रकारितेचे बहुमूल्य योगदान - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - पत्रकार हे समाजातील वास्तव पत्रकारितेच्या माध्यमातून मांडतात, समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडतात तथापि पत्रकारिता आणि साहित्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. चांगल्या पत्रकारितेसाठी व स्तंभलेखनासाठी पत्रकार बांधवांनी साहित्य व इतिहासाचे सखोल वाचन केले पाहिजे, असे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
मुधोजी महाविद्यालयाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणून बोलत होते. मुधोजी महाविद्यालयाच्या प्रसिद्धी समितीने आयोजित केलेल्या या सोहळ्यामध्ये फलटण व पंचक्रोशीतील विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे २५ पत्रकार उपस्थित होते.
आज प्रिंट मीडिया पेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडिया हा जलद व तात्काळ वृत्तांकन करण्याचे महत्त्वपूर्ण साधन बनलेला असला तरी प्रिंट मीडियाच्या माध्यमातून येणारे स्तंभलेख किंवा वैचारिक लेख ही खरी पत्रकारिता असून ती कधीही कालबाह्य होऊ शकणार नाही असे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मांडले. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून भारतीय प्रगल्भ लोकशाहीत त्यांचे योगदान अत्यंत बहुमूल्य राहिले आहे किंबहुना स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा पत्रकारितेच्या माध्यमातूनच भारतीय स्वातंत्र्याची नांदी झाल्याचे आपणाला दिसून येते.
याप्रसंगी फलटण मधील दैनिक ऐक्यचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता, स्थैर्य चे प्रसन्ना रुद्रभटे,दादासाहेब चोरमले,यशवंत खलाटे, बापूराव जगताप, विशाल शिंदे, आदी पत्रकार बंधू महाविद्यालयाच्या विनंतीस मान देऊन सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले. महाविद्यालयाने त्यांचा सन्मान शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन तसेच उचित आदराथित्यपूर्वक केला. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच कदम, कला शाखाप्रमुख डॉ. ए. एन शिंदे डॉ. पी.आर पवार प्रसिद्धी समितीचे प्रमुख डॉ. बी.जी सरक व निवेदक म्हणून प्रा. यांची वेळेकर व प्राध्यापक आणि विद्यार्थी वृंद उपस्थित होते.
No comments