Breaking News

महेश खुटाळे "संजीवन विद्यालय जीवन गौरव" पुरस्काराने सन्मानित

Mahesh Khutale honored with "Sanjeevan Vidyalaya Jeevan Gaurav" award

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.12 - क्रीडा क्षेत्रात गेली सेहेचाळीस वर्षे योगदान दिल्याबद्दल फलटण जि. सातारा येथील निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी व क्रीडा प्रशिक्षक महेश मधुकर खुटाळे यांना पाचगणी जि. सातारा येथील प्रख्यात "संजीवन विद्यालय जीवन गौरव पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे. विद्यालयाच्या विश्वस्त श्रीमती अनघा देवी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

    पाचगणी जि. सातारा येथील संजीवन विद्यालय येथे सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त व भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक क्लारेन्स लोबो, संजीवन विद्यालय ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती शशिताई ठाकर, प्राचार्य धनंजय शिरूर, श्रीमती क्लारिस्ट डिसिल्वा, विनिता दाते, नेहा शहा आदींची उपस्थिती होती.

    महेश खुटाळे यांनी क्रीडा क्षेत्रातील हॉकी खेळासाठी गेली ४६ वर्ष ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी  महाराष्ट्राच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, तालुका क्रीडा अधिकारी (वर्ग-२), हॉकी महाराष्ट्र संघटनेचे सहसचिव, दी हॉकी सातारा संघटनेचे सचिव व महाराष्ट्र शासनाच्या विविध राज्यस्तरीय समित्यांमध्ये वेगवेगळी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. तसेच शासकीय नोकरीत खेळाडूंसाठी असणाऱ्या पाच टक्के आरक्षणाबाबत राज्यातील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मार्गदर्शन करणे, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयांना क्रीडा खात्याच्या विविध योजनांची परिपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन करणे, गावोगावी खेळाच्या जास्तीत जास्त सुविधा कशा निर्माण होतील यासाठी विशेष मोहीम राबविणे, कामकाजाच्या बाबत नि:पक्षपाती, काटेकोर व सातत्यपूर्व खेळाडूंच्या हितास प्राधान्य देण्याची निर्भीड भूमिका अशी त्यांची विविधांगी भूमिका राहिली आहे. आजवरच्या क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याची व दिलेल्या योगदानाची दखल घेऊन महेश खुटाळे यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

    कार्यक्रमास हॉकी प्रशिक्षक सचिन कांबळे, सुजीत निंबाळकर, सचिन धुमाळ, धनश्री क्षीरसागर, अनिकेत अडागळे, योगेश देशपांडे यांच्यासह कोल्हापूर विद्यापीठाच्या हॉकी संघाचे कर्णधार विनय नेरकर, कपिल मोरे, अथर्व पवार व हॉकी खेळाडू उपस्थित होते.

    सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल महेश खुटाळे यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व्यक्त होत आहे.

No comments