Breaking News

बिल्डर असोसिएशनने जोपसलेली सामाजिक बांधीलकी कौतुकास्पद व प्रेरणादायी : रविंद्र बेडकीहाळ

Social commitment cultivated by Builder Association is commendable and inspiring: Ravindra Bedkihal

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० - बिल्डर असोसिएशन फलटण सेंटरने अल्पावधीत केलेली व्यावसाईक प्रगती  व सामाजिक बांधीलकी स्वीकारुन राबविलेले उपक्रम कौतुकास्पद व प्रेरणादायी असून पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर बिल्डर व पत्रकार या दोन्ही संघटना एकत्र आल्या याचा मनापासून आनंद होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र कल्याण निधीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांनी केले.

    बिल्डर्स असोसिएशन फलटण सेंटरच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंती दिनी पत्रकारांच्या सत्काराचे आणि बिल्डर्स असोसिएशन दिनदर्शिका प्रकाशन अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन येथील बिल्डर असोसिएशन ट्रेनिंग सेंटर येथे करण्यात आले होते, यावेळी मार्गदर्शन करताना  बेडकीहाळ बोलत होते. व्यासपीठावर बिल्डर्स असोसिएशन फलटण सेंटरचे अध्यक्ष किरण दंडीले, माजी अध्यक्ष राजीव नाईक निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रा. रमेश आढाव, युवराज पवार होते.

    रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, बिल्डर हे समाजातील विविध घटकांच्या स्वप्नातील घरांची उभारणी करीत असतात तर पत्रकार हे आपल्या लेखणीतून समाज मनाची उभारणी करीत असतात, उभारणी करणारे हे दोन घटक आज एकत्र आले असल्याने या समारंभाला वेगळे महत्त्व असल्याचे निदर्शनास आणून देतांना कोकणातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या दुर्गम भागातील गावातून मुंबई येथे जाऊन एलफिस्टन या गव्हर्नरच्या प्रेरणेने बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व विज्ञानाचे शिक्षण घेतले. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाचे प्रश्न इंग्लिश व अन्य भाषिक  वृत्तपत्र मांडत होते, त्यावेळी मराठी माणसाचे प्रश्न मांडण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध असावे असे बाळशास्त्री जांभेकर यांना वाटले आणि स्वतःची काहीही ऐपत नसताना त्यांनी दि. ६ जानेवारी १८३२ रोजी पाहिले दर्पण हे वृत्तपत्र सुरु केले. वास्तविक बाळशास्त्री जांभेकर हे इंग्रजांच्या एलफिस्टन कॉलेजमध्ये पहिले भारतीय प्रोफेसर होते. इंग्रजांच्या सत्तेमध्ये ते नोकर होते, पण तरीसुद्धा इंग्रजांचं कुठे चुकतंय हे सांगण्याचं धाडस त्यांनी त्या काळात दर्पण वृत्तपत्रामधून केले.

    पूर्वीच्या राजेशाहीनंतर लोकशाहीची नवीन चौकट तयार झाली. एका बाजूला लोकप्रतिनिधी व दुसऱ्या बाजूला कायदे राबवणारे प्रशासन यांच्यामध्ये कोण चुकतंय हे सांगण्याची परंपरा बाळशास्त्री जांभेकरांनी त्या वेळेपासून घालून दिलेली होती, त्या परंपरेला फलटण तालुक्यातील पत्रकार आजही बांधील आहेत. अनेक राजवटी आल्या गेल्या परंतू फलटण तालुक्यातील पत्रकारिता कोणालाही बधली नसल्याचे रविंद्र बेडकीहाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

    प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व सर विश्वेश्वरैया मोक्षगुंडम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

    यावेळी प्रस्ताविकामध्ये अध्यक्ष किरण दांडिले यांनी असोसिएशनने राबविलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.  असोसिएशनच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

    फलटण तालुक्यामध्ये सर विश्वेश्वरय्या यांचे योगदान फार मोठे असल्याचे सांगताना संस्थान काळात भाटघर धरणाचा कलवा फलटण संस्थानमधून नेण्यासाठी श्रीमंत मालोजीराजे यांनी विश्वेश्वरैया मोक्षगुंडम यांचे नाव सुचवले, कारण त्यावेळी म्हैसूरच्या वड्डीयार राजाने त्यांच्या सहकार्याने तेथे काही धरणे बांधली असल्याने त्यांचे कर्तृत्व त्यांची विद्वत्ता आपल्या कामी यावी याकरिता त्यांच्याकडूनच हे सर्वेक्षण करुन घेऊन या कालव्याचे काम करण्याचे मालोजीराजे यांचे म्हणणे ब्रिटिश सरकारने मान्य केले त्याप्रमाणे कालवा पूर्ण झाला आणि त्यानंतर फलटण संस्थान मधील अनेक बांधकामासाठी विश्वेश्वरैया मोक्षगुंडम यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे बेडकिहाळ यांनी निदर्शनास आणून दिले.

    शिवसंदेशकार माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्यापासून फलटणच्या उज्वल पत्रकारितेला सुरुवात झाली. त्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरु असताना एकीकडे ते या लढ्याचे व दुसरीकडे ते पत्रकारांचे नेतृत्व करीत होते. हरिभाऊ निंबाळकर यांनी शिवसंदेश या वृत्तपत्राची केलेली उभारणी आम्ही जवळून पाहिली आहे. ग्रामीण भागातल्या पत्रकारांचे विद्यापीठ असा स्व. हरिभाऊ निंबाळकर यांचा लौकिक आहे. त्यांच्या विद्यापीठामधून फलटणच्या ग्रामीण भागासह सातारा जिल्ह्यातील अनेक पत्रकार तयार झाले असल्याचे बेडकीहाळ यांनी निदर्शनास आणून दिले.

    बिल्डर्स असोसिएशन महाराष्ट्र सेंटरचे माजी अध्यक्ष रणधीर भोईटे यांनी फलटण सेंटरने प्रथमच पत्रकार दिन व पत्रकारांच्या सत्काराचे नियोजन केले आहे, तथापि या निमित्ताने अपेक्षीत मार्गदर्शनाचा लाभ झाल्याचे सांगत रविंद्र बेडकिहाळ यांनी केलेल्या सूचनांचे पालन आणि विशेषतः पत्रकारांसाठी घरे ही संकल्पना निश्चित राबविता येईल याची ग्वाही दिली.

    बिल्डर्स असोसिएशन फलटण सेंटरचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर विद्यमान अध्यक्ष किरण दंडीले यांनी प्रास्ताविकात फलटण सेंटरच्या १८ वर्षातील कामकाजाचा आढावा घेताना विशेषत: राबविलेल्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. सेंटरचे सेक्रेटरी स्वीकार मेहता व रणधीर भोईटे यांनी सूत्रसंचालन आणि समारोप व आभार सहसचिव आनंदराव काळूखे यांनी मानले.

    कार्यक्रमास बिल्डर असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, दिलीप शिंदे, यांच्यासह असोसिएशन आजी माजी पदाधिकारी, सदस्य व विविध साप्ताहिकांचे संपादक, विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेलचे संपादक, प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments