Breaking News

चर्मकार समाजावरील अपमानास्पद वक्तव्याचा जाहीर निषेध ; ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

Protest against statement on Chambhar community

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२७ - चर्मकार (चांभार) समाजाविरोधात “चोर चांभार” असे अपमानास्पद आणि जातीय द्वेषाने भरलेले वक्तव्य करणाऱ्या नदीम खान व ते प्रसारित करणाऱ्या यूट्यूब चॅनलविरोधात राज्यभर तीव्र रोष उसळला आहे. या घटनेमुळे समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झालीअसून ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटत आहेत. आज फलटण येथे उपविभागीय अधिकारी यांना गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघाच्यावतीने निवेदन देऊन संबंधितावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. 

    “गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघा”चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. दिपक सिताराम खोपकर यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. त्यांनी म्हटले, “नदीम खान याने केलेले वक्तव्य केवळ अपमानकारक नसून, संविधानाच्या मूल्यांविरुद्ध आहे. व्हायरल बॉलिवूड चॅनलने ते प्रसारित करून समाजात विष पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारांमुळे सामाजिक शांततेला तडा जाऊ शकतो.” संघटनेने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, 1989 (अट्रॉसिटी कायदा) अंतर्गत दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर अशा चॅनल्सना बंदी घालून समाजविघातक प्रवृत्तीवर कडक निर्बंध आणण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

    घटनेच्या निषेधार्थ फलटण शहरात “गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघा”च्या वतीने शहर अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी मा. उपविभागीय अधिकारी  यांना निवेदन दिले. या वेळी फलटण तालुका अध्यक्ष मंगेश बोबडे, गणेश भोईटे, सुमित पवार, केतन रणवरे, अक्षय कोंडे, अशोक बोबडे, विशाल बोबडे, गणेश बोबडे, सनी अहिवळे, राजेंद्र खरात, अक्षय भोसले, रामचंद्र कांबळे उपस्थित होते
संघटनेच्या ठोस मागण्या:
1.नदीम खान याला अटक करून अट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करावी. 2. “व्हायरल बॉलिवूड” चॅनलचे प्रसारण तत्काळ थांबवून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा.3. प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी. 4.समाजविघातक व चिथावणीखोर सामग्रीवर त्वरित नियंत्रण आणण्यासाठी कडक कायदे लागू करावेत.

No comments