सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील ; डूडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली
सातारा दि २ (प्रतिनिधी) - सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेली आहे. त्यांच्या जागेवर संतोष पाटील यांची वर्णी लागली आहे. अठरा महिन्याची जितेंद्र डूडी यांची साताऱ्याची कारकिर्द लक्षवेधी ठरली आहे.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर 7 जून 2023 रोजी त्यांच्या जागेवर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून वर्णी लागली होती. गेल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात डूडी यांनी अनेक लोकाभिमूख निर्णय घेवून जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली होती. महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमध्ये बोकाळलेल्या अतिक्रमणांविरोधात डूडी यांनी खमकी भूमिका घेऊन ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती. तसेच कास येथील अतिक्रमणांविरोधातही डूडी यांनी हातोडा उगारलेला होता. स्मार्ट स्कूल , स्मार्ट पीएचसी गौण खनिज महसूल वृध्दी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे नेटके नियोजनं , न्यू महाबळेश्वर प्रकल्पात प्रस्तावांचे सुलभीकरण या माध्यमातून डूडी यांनी आपल्या कामाची अवध्या अठरा महिन्यात छाप पाडली होती.
दरम्यान, आज राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार डूडी यांची बदली पुणे जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष पाटील मूळचे उंडेगाव ता बार्शी येथील आहेत १९९६ मध्ये उपजिल्हाधिकारी यवतमाळ म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात केली . २०१६ ते २०१८ मध्ये नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी , २०२० मध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त पदाची जवाबदारी तर मार्च २०२ ४ पासून ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी म्हणून कामकाज पहात होते.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाने डुडी यांच्या बदलीचे काढलेले आदेश जिल्हा प्रशासनाला अप्पर सचिव व्ही राधा यांच्या आदेशाने प्राप्त झाले आहेत . डुडी लवकरच पुणे जिल्हयाची तर संतोष पाटील सातारा जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारतील अशी माहिती देण्यात आली आहे.
No comments