माजी खासदार व आमदारांनी केलेले वक्तव्य चुकीचे ; घडसोली मैदानाचा वापर हा केवळ खेळासाठीच - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.3 - घडसोली मैदान हे मुधोजी हायस्कूलमधील सुमारे ५ हजार ५०० विद्यार्थ्यांसह शहर व तालुक्यातील खेळाडू विविध खेळांसाठी वापरत असून शासनाने ते २०४७ पर्यंत भाडेकराराने फलटण एज्युकेशन सोसायटीला दिले आहे. सोसायटीने २०४७ पर्यंतचे संपूर्ण भाडे आगाऊ जमा केल्याचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी
पत्रकार परिषदेत निदर्शनास आणून दिले व माजी खासदार व आमदारांनी केलेले वक्तव्य दिशाभूल करणारे असून या मैदानात खेळ खेळण्यासाठी कोणालाही प्रतिबंध केला जात नसल्याचे सांगितले.
माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ.सचिन पाटील यांनी घडसोली मैदानाबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांनी लक्ष्मी विलास पॅलेस येथे पत्रकार परिषद घेऊन सदर भूखंडाबाबत माहिती दिली आणि भूखंड आमच्या ताब्यात असून तो केवळ खेळासाठीच वापरला जात असल्याचे स्पष्ट केले.
श्रीमंत संजीवराजे म्हणाले, सदर भूखंड मूळचा राजे कुटुंबाचा होता पण संस्थान विलीनीकरण प्रक्रियेत मुधोजी हायस्कूल इमारतीसह हायस्कूलचे क्रीडांगण असलेला हा भूखंड शासनाकडे गेला होता. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शासनाने मुधोजी हायस्कूल व सदर खेळाचे मैदान आमच्याकडे पुन्हा सुपूर्द केले. मात्र खेळाचे मैदान परत करताना भाडे कराराची अट ठेवली आहे. विद्यार्थ्यांना खेळाचे मैदान आवश्यक असल्याने आम्ही ती अट स्वीकारली असून त्याप्रमाणे करार करणे व भाडे जमा करण्याची प्रक्रिया नियमित सुरू आहे. वास्तविक अधिकाऱ्यांनी त्याबाबत माहिती न घेता चुकीची माहिती देणे गैर व अवाजवी आहे. त्या ठिकाणी ज्याप्रमाणे मुधोजी हायस्कूलमधील साडेपाच हजार विद्यार्थी दररोज विविध खेळांचे सराव करतात, त्याप्रमाणे तेथे हॉकी, फुटबॉल वगैरे खेळाची मैदाने आहेत. अलीकडे लेदर बॉल क्रिकेटसाठी अॅकॅडमी स्थापन केली असून मोठ्या संख्येने त्यामध्ये मुले सहभागी होत आहेत. तेथे हॉकीसाठी अॅस्ट्रो टर्फ मैदान नव्याने तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तेथे उत्तम जिम साहित्य बसविले आहे. कमिन्सने उत्तम स्वच्छतागृह उभारले आहे, स्टेडियम उभारण्याचा प्रयत्नही झाला परंतु सदर जागा त्यासाठी पुरेशी नसल्याने स्टेडियमऐवजी छोटे क्रीडांगण आणि कायम स्वरूपी बाल्कनी उभारण्याचा प्रयत्न आहे.
दरम्यान आजही तेथे हॉकी, फुटबॉल, खो-खो वगैरे मैदाने तयार केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या मैदानावर आतापर्यंत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा ४ वेळा आयोजित करण्यात आल्या. त्यावेळी राज्याच्या विविध जिल्ह्यातील खेळाडूंनी केलेल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन पाहण्याची संधी फलटणकरांना उपलब्ध झाली. येथे हॉकीच्या अनेक महिला खेळाडू तयार झाल्या. त्या राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळत असून नुकत्याच ३ मुली हॉकीमध्ये राष्ट्रीय स्तरावर उच्च गुणवत्तेच्या मानकरी ठरल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. सदर जागेवर झालेली अतिक्रमणे रोखण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीने कुंपण भिंत घातल्याने अतिक्रमणे थांबली म्हणून सदर खेळाचे मैदान शिल्लक राहिले. सदर मैदान सर्व खेळाडूंसाठी उपलब्ध आहे किंबहुना मुधोजी हायस्कूलमध्ये सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचे आणि त्यांच्या मुलांचे शिक्षण तेथे झाल्याने आपल्यासह सर्वांनी तेथे विविध खेळ खेळले असल्याने तेथे कोणालाही प्रतिबंध केला जात नसल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
शहराच्या दक्षिणेस जाधववाडी परिसरात तालुका क्रीडांगण, डी. एड. कॉलेज, आय. टी. आय. वगैरेसाठी आमच्या कुटुंबाची सुमारे १३ एकर जमीन आम्ही विनामोबदला दिली असल्याने तेथे शेकडो मुले आज शिक्षण घेतात, खेळतात. भविष्यात तेथे स्टेडियम उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे, शासनाने सदर तालुका क्रीडा केंद्राच्या ठिकाणी स्टेडियम उभारावे अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
No comments