बुद्धविहाराला जागा मिळण्यासाठी साखरवाडी ते फलटण २० किलोमीटर पायी लॉन्ग मार्च
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१० फेब्रुवारी - साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा या गावातील बौद्ध समाजाने गावात बुद्ध विहारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी घेऊन, साखरवाडी येथील नागरिकांनी चालत २० किलोमीटर लॉंग मार्च करत फलटण येथे येऊन, निदर्शने करत बुद्ध विहाराला जागा देण्याची मागणी केली.
यावेळी फलटण तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बुद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून ते सामाजिक ऐक्य, शैक्षणिक विकास आणि समाजजागृतीचे केंद्र म्हणून कार्य करते. तथापि, बौद्ध समाजासाठी कोणतेही विहार किंवा सार्वजनिक प्रार्थना केंद्र नाही. यामुळे समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आणि सांसस्कृतिक विकासाला अडथळा येत आहे.
गावातील बौद्ध समाजाच्या वतीने प्रशासनाकडे साखरवडीत २६ वर्षे दुर्लक्षित व पडीक असलेल्या जुन्या पोलिस स्टेशनची सरकारी जागा मंजूर करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, बुद्ध विहारच्या निर्मितीसाठी आवश्यक परवानग्या त्वरित मिळाव्यात, आशीही मागणी करण्यात आली आहे.
संविधनाने प्रत्येक नागरिकाला आपला धर्म पाळण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे बौद्ध समाजाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर लोकशाही मार्गाने पुढील आंदोलनात्मक पावले उचलली जातील, असा इशारा देण्यात आला आहे.
No comments