आयकर विभागाकडून श्रीमंत संजीवराजे यांना क्लीन चीट ; आक्षेपार्ह काही आढळले नाही
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१० फेब्रुवारी - जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घराची आयकर विभागाकडून ५ दिवसापासून सुरू असलेली तपासणी काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संपली. पूर्ण झाल्यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, तपासणी दरम्यान आयकर विभागास आक्षेपार्ह आढळून आले नाही, उलट गोविंद मिल्क प्रॉडक्टच्या कारभाराबाबत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असल्याचे सांगितले. दरम्यान श्रीमंत संजीवराजे यांची तपासणी पूर्ण होऊन, आयकर विभागाकडून क्लीन चीट मिळाल्याचे समजताच, समर्थकांनी श्रीमंत संजीवराजे यांच्या नावाचा जयघोष करत आनंद व्यक्त केला.
बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुणे येथील तसेच फलटण येथील घरावर आयकर विभागाकडून पहाटे ६ वाजता छापा टाकून तपासणीचे कामकाज चालू करण्यात आले ते दि.९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संपले. त्यांनतर श्रीमंत संजीवराजे यांनी कार्यकर्त्यांशी व पत्रकारांशी संवाद साधला.
ही पॉलिटिकल रेड होती का नव्हती ते मला काही सांगता येणार नाही, परंतु सध्याचा काळ असा आहे की, कशाला पॉलिटिकल रेड म्हणायची व कशाला नाही, हे सध्या अवघड झालेले आहे, पाच दिवसापासून त्यांनी घरचे कागदपत्रे, गोविंद मिल्क येथील कागदपत्रे तपासणी केली, त्यांना आक्षेपार्ह काही आढळून आले नाही. घरी २ लाख ३५ हजार रुपये कॅश सापडली, तसेच घरी दागदागिने व लॉकरमध्ये सापडलेले दागदागिने, तपासणी पूर्ण झाल्यानंतर मला परत दिलेले आहेत आणि गोविंद मिल्क प्रॉडक्टचे कामकाज अत्यंत समाधानकारक असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला कोणताही त्रास झाला नाही, आम्ही त्यांना सहकार्य केलं, त्याप्रमाणे त्यांचीही तशी वर्तणूक होती. आमचे जे दागदागिने सापडले ते त्यांच्या नॉर्मस्मध्ये बसत असल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कार्यवाही न करता ते परत दिले असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
No comments