पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने लोणंद सातारा रस्त्यावरील अतिक्रमण हटवले
लोणंद दि.१० (प्रतिनिधी) - लोणंद - सातारा रोड तसेच शिरवळरोड, खंडाळारोड, बसस्थानक याठिकाणी नित्याचेच झालेल्या ट्रॅफिक जाम च्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशानाने एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पुढाकार घेत लोणंद नगरपंचायत, पोलीस प्रशासन, वीज वितरण विभाग यांच्यात समन्वय साधून पोलिस बंदोबस्तात आज मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली.
काही दिवसांपासून समाज माध्यमातुन मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांवर सोमवारपासून कारवाई होणार असल्याचे धोरण जाहीर करण्यात आले होते. शिरवळरोड परीसरातील अनेकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली होती. मात्र लोणंद सातारा रस्त्यावरील अनेक अतिक्रमणधारक आपल्याच तोऱ्यात निवांत होते. मात्र आज सकाळी सर्व विभागांनी एकत्र येत आक्रमक कारवाईचा धडाका चालू करताच अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. यावेळी जेसीबी लावून टपऱ्यां, खोकी हटवण्यात आल्या. शिरवळ चौक परिसरात मोठी अवजड वाहने वळताना होणारी अडचण लक्षात घेवून याठिकाणची दुकानेही आज या मोहिमेदरम्यान काढण्यात आली.
पुणे सातारा रोडवरील विजेच्या खांबांचा आधार घेतलेली अतिक्रमणे जेसीबी च्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. शास्त्री चौक खंडाळा रोडवरील अतिक्रमणेही हटवण्यात आल्याने हा परिसरात वाहनांसाठी मोठी जागा मोकळी झालेली पहावयास मिळत आहे. यावेळी नायब तहसीलदार चेतन मोरे , योगेश चंदनशिवे , मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, एनएचएआयचे भूमी संपादन समन्वयक अधिकारी लक्षमण पाटील, टेक्निकल मॅनेजर पंकज प्रसाद , लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशील भोसले सागर मोठे, रोहित लिंबाळकर, विजय बनकर, अमोल पवार, पोपट क्षीरसागर, संदीप जाधव, प्रशांत नेवशे, नाना शेळके, रामदास तुपे, मयुरी दीसले, बाळासाहेब भिसे, प्रशांत मडके, वैजनाथ गाडे, वैभव शेळके, नवनाथ होटकर, निलेश दुरगार्डे, दादा खोत, तानाजी बोडरे आदि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
रोजच्या ट्रॅफिक जाम च्या समस्येने हैराण झालेले लोणंदकर सर्वसामान्य नागरिक व वाहनचालक या अतिक्रमण हटाव मोहिमेवर समाधान व्यक्त करत आहेत. तसेच भविष्यात पुन्हा याठिकाणी अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी संबंधित प्रशासनाकडून खबरदारी घेतली जावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
No comments