फलटण तालुक्यात सर्वात जास्त घरकुलं देऊ शकलो याचा आनंद - आ.सचिन पाटील
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - फलटण तालुक्यात जवळजवळ २९७८ घरकुलाचा पहिला हप्ता दिलेला आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा झाला आहे. सगळ्यात जास्त घरकुलं मी, या तालुक्यात देऊ शकलो, याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. घरकुलाचा हप्ता दिल्यानंतर व मंजुरी आदेश वितरण केल्यानंतर लाभार्थी गोरगरीब शेतकऱ्यांच्या व कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हा माझ्यासाठीही आनंद देणारा क्षण होता असे प्रतिपादन आमदार सचिन पाटील यांनी केले.
पंचायत समिती फलटण, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन 2024 - 25 अंतर्गत लाभार्थी कार्यशाळा व मंजुरी आदेश वितरण कार्यक्रम, पंचायत समिती फलटण येथे आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सचिन पाटील बोलत होते.
पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले की, सध्या 969 घरकुले मंजूर आहेत, परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत, त्या अडचणी सोडवल्यानंतर त्यांनाही घरकुल मिळेल. ज्यांना जागा नाही, त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, जागा उपलब्ध असेल तर, त्यांना जागा देण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले.
No comments