आमदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये ; जनतेची दिशाभूल करू नये - मा. आ. दीपक चव्हाण
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ - फलटण आगारात आलेल्या १० बसेस याची आम्ही पूर्वीच मागणी केली होती, २०२१ सालापासून आम्ही बसेस मागणी करत आहोत, त्या काळात अनेक बैठकाही झाल्या होत्या मात्र तत्कालीन शासनाकडून निर्णय घेण्यात आला न्हवता, त्यामुळे बसेस प्रलंबित होत्या, मात्र आता शासनाकडून निर्णय घेण्यात आला व त्या बसेस देण्यात आल्या, राज्यातील सर्वच एसटी बस डेपोंची बसेसची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. मागील ३० वर्षात रामराजे साहेब व माझ्या कारकिर्दीत अनेक वेळा अशा बसेस आलेले आहेत परंतु आम्ही त्याची प्रसिद्धी कधीही केली नाही, मात्र काल फलटण आगारात १० बसेस आल्या तर विद्यमान आमदारांनी असे भासवले की जणू काही त्यांच्याच मागणीमुळे या बसेस आल्या आहेत. फलटण बस डेपो सुधारण्यासाठी आम्ही या अगोदरच प्रयत्न करून, काँक्रिटीकरण करणे बारामती बस थांबा वेगळा करणे अशी अनेक कामे मार्गी लावले आहेत, आताही विद्यमान आमदारांनी सोयी सुविधा कराव्यात, त्यांना लोकांनी संधी दिली आहे, मात्र विद्यमान आमदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये व लोकांची दिशाभूल करू नये असे आवाहन माजी आमदार दीपक चव्हाण यांनी केले.
फलटण डेपो मध्ये दहा नवीन बसेस आल्यानंतर माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते त्या बसेसचा लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर माजी आमदार दीपक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.
फलटण शहराच्या विकासासाठी नगरोत्थान योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजना अशा अनेक योजनेतून कोट्यावधी रुपयांचा निधी नगरपालिकेला आणलेला आहे व आजही ती कामे सुरू आहेत परंतु या कामांची खासदार गटाकडून अडवणूक होत आहे व आम्ही आणलेल्या कामांचे नारळ फोडण्याची पद्धत सध्या सुरू आहे, अशी पद्धत विरोधकांनी थांबवली पाहिजेत. फलटण शहरात प्रभाग क्रमांक ६ मध्ये १ कोटी ५० लाख रुपयांचे नदीपात्रातील वॉल बांधण्यासाठी आमच्या फंडातून मंजूर केले होते, त्या कामाचा देखील नारळ विरोधकांनी फोडला. तसेच प्रभाग क्रमांक ९ मध्ये अरविंद पवार ते मलानी घर डांबरीकरण करणे या कामाचा देखील विरोधकांनी नारळ फोडला, अशी अनेक कामे आहेत, आम्ही केलेल्या विकास कामांचा विरोधक सध्या नारळ फोडत आहेत, विद्यमान आमदारांना सहा महिने फक्त नारळ फोडण्याचेच काम करावे लागेल, एवढी विकास कामे आम्ही अगोदरच मंजूर केलेली आहेत. नारळ फोडण्याबद्दल आमचा वाद नाही परंतु ज्यांनी काम केले त्यांना बोलावले पाहिजे होते. अधिकाऱ्यांनीही असा दुजाभाव न करता प्रोटोकॉल पाळला पाहिजे. सध्या अधिकाऱ्यांची मनमानी चालू आहे त्यांनी व्यवस्थित वागले पाहिजे अन्यथा पुढील काळात अधिकाऱ्यांशी कश्या पद्धतीने वागायचे ते आम्हाला ठरवावे लागेल असा इशारा माजी आमदार दीपक चव्हाण यांनी दिला.
No comments