Breaking News

फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे परत द्यावे व संबंधितांवर कारवाई करावी - स्वाभिमानी शेतकरी संघटना

Money taken from farmers to issue Farmer ID should be returned and action should be taken against concerned - Swabhimani Farmers Association

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.५ फेब्रुवारी - फार्मर आयडीसाठी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या ई महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांचे परवाने रद्द करून, शेतकऱ्यांचे घेतलेले पैसे परत मिळावे व या प्रकरणी तहसीलदार अभिजित जाधव यांची चौकशी करुन जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी व शासकीय विभागाकडे करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह उर्फ धनंजय संपतराव महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, प्रमोद गाडे, रवींद्र घाडगे, बाळासाहेब शिपुकले,  प्रल्हाद अहिवळे,किसन शिंदे, किरण भोसले  उपस्थित होते.

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा व फलटण तालुका तर्फे खालील प्रमाणे तक्रार अर्ज दाखल करत असून आपण याप्रकरणी जबाबदार अधिकारी या नात्याने खालील मुद्द्यान्वये ई.महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व तहसीलदार अभिजित जाधव यांची चौकशी करून कारवाई कराल ही अपेक्षा व्यक्त करतो.

    काही दिवसापूर्वी शासनाने शेतकऱ्यांना योजना मिळाव्या म्हणून फार्मर आयडी काढा असे सांगितले होते. शासनाने ई.महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना पैसे देत असताना फलटण तालुक्यातील ई. महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र मालकांनी मोफत योजना असताना फार्मर आयडी करीता शेतकऱ्यांकडून 100 रु, 200 रु,300 रुपये असे पैसे घेऊन, आयडी काढायला सूरवात केली आहे. केंद्र मालक पैसे घेत असल्याने आयडी काढण्याचे कामकाज ठप्प झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या याबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या असून आत्तापर्यंत अंदाजे 20 हजार आयडी काढले असून, फार्मर आयडी काढणे मोफत असताना शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे का घेतले याबाबत ई.महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र मालक यांना विचारले असता त्यांनी आम्हाला तहसीलदार अभिजित जाधव यांनी मीटिंग मध्ये पैसे घ्यायला सांगितले आहेत असे सांगितले. 

    तहसीलदार अभिजित जाधव यांनी केंद्र चालक यांना 20 ते 30 रुपये एका फार्मर आयडी काढायला घ्या असे सांगितले असून शासनाकडून फार्मर आयडी काढल्यास पैसे केंद्र चालक यांना मिळत असताना 20 ते 30 रुपये कशासाठी घ्यायला लावले कोणत्या आदेशाने व नियमाने घ्यायला लावले. तहसीलदारांनी पैसे घ्यायला सांगितले म्हणून केंद्र चालक यांनी शेतकऱ्यांकडून 100,200,300 असे पैसे घेऊन आय डी काढले आहेत. केंद्रांनी लाखो रुपये लाटले आहेत पैसे घेलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ परत करावेत व या प्रकरणाची चौकशी करावी पैसे घेतलेल्या सर्व केंद्रांचे परवाने रद्द करावेत.

    तहसीलदार अभिजित जाधव यांना शासनाने दिलेले आदेश न पाळता जाणीवपूर्वक आर्थिक हेतूपोटी परस्पर पैसे घेण्यास सांगितल्याचे पुरावे आम्हाला सापडले असून ते आम्ही चौकशी कामी चौकशी अधिकारी यांच्याकडे दाखल करु तालुक्यात मनमानी कारभार करत बेकायदेशीर फार्मर आयडी काढायला पैसे घ्यायला सांगणाऱ्या तहसीलदार अभिजित जाधव यांच्यावर त्यांना दिलेले नेमून दिलेले काम पार न पडता चुकीचे काम केल्याबाबत तत्काळ खातेनिहाय चौकशी करण्यात यावी खातेनिहाय चौकशीत आम्हालाही साक्षीदार म्हणून दाखल करण्यात यावे या प्रकरणाची चौकशी लवकर करण्यात यावी.

    याप्रकरणी तहसीलदार अभिजित जाधव व सर्व फलटण तहसील कार्यालय अंतर्गत येणारी ई.महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांचा चौकशी अहवाल प्रसिद्ध करावा शेतकऱ्यांतून घेतलेले पैसे तत्काळ परत करावेत. सविस्तर चौकशी करून दोषींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. तत्काळ याप्रकरणी दखल न घेतल्यास संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल व त्याप्रकरणी स्वतंत्र तक्रार दाखल करायला भाग पाडू नये.स्वाभिमानी शेतकरी संघटना याविषयी आंदोलन करणार आहे शेतकऱ्यांची झालेली आर्थिक लूट प्रकरणी रस्त्यावर उतरून आंदोलन करून दोषींवर कारवाईची मोहीम हाती घेण्यार आहे.

No comments