अज्ञात वाहनाने धडक दिल्याने टाकळवाडे येथील तानाजी शिंदे यांचा मृत्यू
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१२ - अज्ञात वाहनाने पाठीमागून मोटार सायकलला धडक दिल्याने टाकळवाडे तालुका फलटण येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेने टाकळवाडे गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत फलटण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दि. 7 रोजी दुपारी 1.45 वा.च्या सुमारास तानाजी रामचंद्र शिंदे आपल्या पत्नीसह मोटरसायकल क्रमांक एम एच 42 बी एच 2378 वरून फलटणहून टाकळवाडे गावी घरी परतत असताना फलटण पंढरपूर रोडवर पवारवाडी विडणी जवळील बालवडकर शेती फार्म येथे आले असताना अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने गाडीवरून पडून गंभीर जखमी झाले. वैद्यकीय उपचारासाठी पुण्याला नेहत असताना त्यांचा मृत्यू झाला. पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी राणी तानाजी शिंदे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. मितभाषी व शांत स्वभावाचे शिंदे प्रगतशील बागातदार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. टाकळवाडे ता. फलटण येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments