शिवथर, वडूथ येथील दोन एटीएम फोडले ; १७ लाखांची रोकड घेऊन चोरटे फरार
सातारा (प्रतिनिधी) दि.१६ : सातारा तालुक्यातील शिवथर येथील भारतीय स्टेट बँक आणि वडूथ येथील बँक ऑफ इंडिया या दोन्ही ठिकाणचे एटीम फोडल्याची घटना रविवारी (दि.१६) सकाळी उघडकीस आली. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून सुमारे १७ लाखांची रक्कम चोरुन नेल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. यावेळी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवथर येथे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आणि वडूथ येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम शनिवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने दोन्ही एटीएम काही वेळाच्या अंतरांनी फोडले. चोरट्यांनी सुरुवातीला वडूथ येथील एटीएम मधून सुमारे १०.५० लाखांच्या आसपास रक्कम चोरी केली त्यानंतर शिवथर येथील एटीम मधून ६.५० लाखांची रक्कम चोरी करत चोरटे लोणंदच्या दिशेने पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.
सदरची घटना ही सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिली. एटीएम मशीन फोडण्यापूर्वी एटीएम मध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा वर स्प्रे मारला. स्प्रे मारताच एटीएम कंपनीला त्या बाबतचा मेसेज गेला. त्यांनी त्याबाबत तक्रार केल्यानंतर 25 ते 30 मिनिटांमध्ये पोलिस घटनास्थळी पोहोचले. यावेळी शिवथर ग्रामस्थ सुध्दा जागे होऊन एटीएम शेजारी गेले होते. परंतु त्याअगोदरच चोरटे पसार झाले होते. यावेळी चोरट्यांनी ३ किलोमीटरच्या अंतरामध्ये असणारी 2 एटीएम मशीन फोडून चोरटे लोणंदच्या दिशेने पसार झाल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमध्ये सराईत टोळीचा हात असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान चोरट्यांच्या शोधासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.
या घटनेच्या तपासाकरीता सातारा तालुका पोलिस स्टेशनच्या तीन व स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन टीम तपासासाठी रवाना झाल्या आहेत.
No comments